सोलापूर: राज्यभरात शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून आचारसंहिता भंग केला आहे. अशी तक्रार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी आमिष म्हणून मेकअप बॉक्सचे वाटप केले. दुपारी आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही बॉक्स वाटप झाल्याचा आरोप आडम यांनी केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मात्र, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मेकअप बॉक्सचे वाटप केल्याचे म्हटले आहे. शिवाय पक्षाने अजून माझी उमेदवारी ही जाहीर केलेली नाही, असेही त्या म्हणाल्या.