मुंबई : अमरावतीचे राणा दाम्पत्य मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानसमोर हनुमान चालिसा पठणाचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. मात्र, नवनीत राणा या सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. अशावेळ काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी नवनीत राणांविरोधात 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
नवनीत राणा यांच्याविरोधात आमदार प्रणिती शिंदे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी प्रणिती शिंदेंना लिहिले आहे. आतापासूनच तयारी केल्यास 2024 मध्ये अमरावतीमध्ये काँग्रेसचा खासदार निवडून येऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे मोठे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत नवनीत राणा खासदार बनल्या आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अडसूळ यांचा पराभव केला. यावेळी नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली होती. तत्पूर्वी 2014 मध्येही नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना अडसूळ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.