राहाता -येथील मंदिरात वेद पठण व मंत्रोपचाराच्या घोषात यज्ञदेवतेला आहुती देत पूर्णाहूतीनंतर महंत रमेशगिरी महाराज व साकुरीच्या उपासनी आश्रमातील कन्यावृंदांच्या हस्ते श्री. साईंच्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. प्रत्यक्ष साईबाबाच राहात्यात अवतरल्याचा आनंद घेत भक्तांनी साईनामाचा गजर केला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री.साई मंदिराला भेट देऊन पाहणी केली. विखे पाटील यांच्याहस्ते श्री.साई व श्री.दत्त मूर्तीला पुष्पहार वाहून त्यांच्याहस्ते आरती करण्यात आली.
राहाता येथील श्री.दत्त मंदिरात शहरातील ग्रामस्थ व साईभक्तांच्या मदतीतून साईंचे मंदिर बांधकाम पूर्ण करून श्री.साईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला. मंडळाचे अध्यक्ष ऍड. दीपक गोपाळ गांधी यांनी माहिती दिली. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी शहरात बांधण्यात आलेल्या साई मंदिरात भाविकांनी रोज दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. किरण लावर व लावर परिवाराच्यावतीने भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.