नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय कीर्तीची स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केले होते. यानंतर तिच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली. समाजामध्ये तेढ पसरवणे आणि गुन्हेगारी कारस्थानाचे आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर ग्रेटाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबत ट्विट करताना ग्रेटा लिहते, ‘मी आताही शेतकरी आंदोलकांच्या बाजूने उभी आहे. कितीही द्वेषभावना, धमक्या अथवा मानवाधिकारांचे उल्लंघन माझी भूमिका बदलू शकणार नाही.” ट्विटमध्ये ग्रेटाने #StandWithFarmers आणि #FarmerProtest हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. तिच्या या ट्विटनंतर प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी पाठिंबा दर्शवला आहे. प्रकाश राजने ग्रेटाचे ट्वीट रि-ट्वीट करत शेतकरी आंदोलनाला त्याचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.