सावरकरांना “भारतरत्न’ देण्यास प्रकाश आंबेडकरांचा विरोध

सोलापूर : सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणे चुकीचे आहे. सावरकर म्हणजे एक माणूस पण दोन चेहरे आहेत, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला आहे.

सोलापुर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, ब्रिटिशांविरोधात बंडखोरी करणाऱ्या पत्री सरकारला पकडून देण्याचे काम सावरकरांच्या हिंदू महासभेने केले होते. सावरकरांनी आपल्या संघटनेतील कार्यकर्त्याला हे करु नका, असे कधी सांगितले नाही. अंदमानातून यातना भोगून आलेल्या या क्रांतिकारकाने पत्री सरकारमधील क्रांतिकारकांना त्याच यातना भोगायला लावल्या, असा आरोप देखील आंबेडकरांनी केला आहे. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

देश पारतंत्र्यात होता तोपर्यंत सावरकर हे क्रांतिकारक होते याबद्दल दुमत नाही. त्या काळात ते ‘हिरो’च होते. मात्र त्यांचा हिंदू महासभेचा दुसरा कालखंड तपासला पाहिजे, असेही ते म्हणाले.

भारतीय अर्थव्यवस्था आणि बॅंकांच्या स्थितीवर आंबेडकर म्हणाले, भारतीय बॅंका बुडणार असून बॅंकांचा वाईट काळ संपलेला नाही. एनपीएची व्याप्ती 72 टक्‍क्‍यांवरुन 76 टक्‍क्‍यांवर गेली आहे. मग बॅंकांचा वाईट काळ संपला असे कसे म्हणता? असा सवाल त्यांनी केला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून 33 हजार कुटुंब भारत सोडून गेले आहेत. आम्हाला सत्ता दिल्यास या सर्व कुटुंबाची लिस्ट देतो. उधळलेल्या घोड्याला लगाम घालण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मत द्या, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.