प्रकाश आंबेडकर यांना सर्व 48 जागा जिंकण्याचा विश्‍वास

मुंबई – वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 48 जागा येऊ शकतात, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. 23 मेनंतर एनडीएला बहुमत मिळण्याची शक्‍यता कमी असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

लोकसभा निवडणुकांच्या आदल्या दिवशी प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांच्या वेळीप्रमाणे राष्ट्रपती भाजपला बोलावतील, पण बहुमत सिद्ध करणं कठीण आहे. राष्ट्रपती कमजोर आहेत. त्यामुळे बिगर भाजप-बिगर कॉंग्रेस सरकार येईल. विरोधक एकत्र राहतील का, ही त्याची परीक्षा आहे. ते एकत्र राहिले, तर एनडीएला कठीण जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी कॉंग्रेस फुटण्याची शक्‍यताही वर्तविली. निवडणुकीनंतर आम्ही सेक्‍युलर पक्षांबरोबर राहू. केसीआर आणि देवेगौडा हे नेतृत्व करण्याची शक्‍यता असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये 40 जागांवर भाजपला फटका बसेल. पश्‍चिम बंगालमध्ये भाजप एक आकडी जागांवर येईल, अशी खात्री त्यांनी व्यक्‍त केली. मात्र, एक्‍झिट पोलवर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

ईव्हीएम हॅक होऊ शकतात, मी ते नाकारत नाही. मात्र आमच्या 48 जागा येऊ शकतात, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.