राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणे म्हणजे सूडाचे राजकारण – प्रकाश आंबेडकर

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आयकर विभागाची (ईडी) नोटीस येणे, म्हणजे विरोधकांचा आवाज बंद करण्याचे कारस्थान असून भाजप देशात सूडाच्या राजकारणाचा प्रघात पाडत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना हा आरोप केला. राज यांनी ज्या पद्धतीने भाजपा विरोधात लोकसभेला प्रचार केला होता ते पाहता त्यांच्यावर ईडीची कारवाई होणे अटळ होते. भाजप विरोधी राजकीय नेत्यांना ईडीची नोटीसा येणे हा शुद्ध ब्लॅक मेलींगचा प्रकार असून जे विकले जात नाहीत, जे दबले जात नाहीत, जे घाबरत नाहीत, अशांनाच ईडीच्या नोटीस पाठवण्यात येत आहेत, असा दावा त्यांनी केला.

राजकीय व्यक्तींनी यापुढे स्वच्छ प्रतिमा जपावी तसेच आपले आर्थिक व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करायला हवेत, तरच भाजपचे हे ईडीचे राजकीय हत्यार विरोधकांना बोथट करता येईल, असेही ते म्हणाले.

कॉंग्रेसशी बोलणी थांबली

विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसला आपण 144 जागा देण्यास तयार आहोत, पण कॉंग्रेस आघाडी करायला पुढे येत नाही, असे सांगतानाच कॉंग्रेसबरोबरची बोलणी थांबलेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी राज्यातील विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवणार आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले. आम आदमी पक्षा (आप) बरोबर विधानसभेसाठी आघाडीची बोलणी चालु आहेत. तसेच आघाडीचे सांगलीचे नेते गोपीचंद पडळक हे शेतकरी कामगार पक्षात जाणार असल्याच्या या सर्व वावड्या आहेत, असा खुलासा आंबेडकर यांनी केला.

पोलिसांची 8 तास ड्युटी करणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत सरकारमध्ये कामगार मंत्री असतांना त्यांनी पोलिसांना केवळ आठ तासाची सेवा असली पाहिजे असा आटोकाट प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याना अपेक्षित असलेली आठ तासाची सेवा अनेक सरकारे लागू करू शकले नाहीत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर राज्यातील लाखो पोलिसांची दिवसाची सेवा फक्त आठ तासाची करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. पोलीसांच्या सोबतीने सुमारे 36000 होमगार्डस देखील कार्यरत आहेत. या होमगार्डसना दरमहा फक्त 2500 ते 3000 रुपये इतकेच मानधन राज्य शासनाकडून दिले जाते. होमगार्डसना भत्ता कामगार ऐवजी पगारी सरकारी कामगार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सरकार मान्यता देईल. हे सर्व मुद्दे निवडणूकीच्या जाहिरनाम्यात घेणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)