विधानसभेसाठी कॉंग्रेससोबत युती नाही: प्रकाश आंबेडकर

एमआयएमसोबत युती कायम

मुंबई (प्रतिनिधी) – जो अनुभव लोकसभा 2019च्या निवडणूकांमध्ये कॉंग्रेसकडून आला तोच अनुभव आता विधानसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान येत आहे. केवळ चर्चेमध्ये गुंतुंन राहणे आता आम्हाला शक्‍य नाही. कॉंग्रेसला फक्‍त आम्हाला खेळवायचे आहे. त्यामुळे विधानसभेसाठी कॉंग्रेससोबत युती करण्याची आमची इच्छा नाही. एमआयएमसोबत आमची युती अद्यापही कायम आहे. ही चर्चा वंचित बहुजन अघाडीचा आणि एमआयएमचा उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत सतत सुरु राहिल, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस सोबत आघाडी करण्याबाबतची प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. कॉंग्रेसला जागावाटपाबाबत दिलेल्या प्रस्तावाचे उत्तर अद्यापही आम्हाला प्राप्त झालेले नाही. त्यांना फक्‍त आम्हाला खेळवायचे आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा विचार आम्ही सोडून दिला असल्याचे ते म्हणाले. लोकसभेच्या आधी देखील कॉंग्रेस नेतृत्वाने आम्हाला खेळवत ठेवले. त्यानंतर आम्ही स्वतंत्र लढून आमची ताकद त्यांना दाखविली. आता देखील त्यांना भाजपाला भिती दाखविण्यासाठीच आमचा उपयोग करायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

खा. इम्तियाज जलील यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याची घोषणा केली आहे, याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, एम आय एम युती बाबत त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वा सोबत वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरु आहे. त्यांचे प्रतिनिधि अमच्याशी चर्चा करायला आले होते. मैत्रीपूर्ण चर्चा झाली. ही चर्चा वंचित बहुजन अघाडीचा आणि एम आय एमचा उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत सतत सुरु राहिल.

विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत युती घडविण्याचा आमचा प्रयत्न कायम राहणार आहे. ओवेसी यांनी त्यांची यादी माझ्याकडे पाठविली आहे. त्यामुळे इतर कोण काय बोलते याला महत्व नाही. एमआयएमसोबत आमची युती अद्यापही कायम आहे.

ईव्हीएम हॅकींगचा धोका नाही

मंदीचा फटका हॅकींग इंडस्ट्रीलाही बसला आहे. त्यामुळे एका हॅकरने या निवडणुकीत ईव्हीएम हॅकींग होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.जो कोणी हॅकिंग करेल त्यालाच ते हॅक करणार आहेत.एका हॅकरने तर प्रतिज्ञापत्र देउन आपण जर न्यायालयाने सांगितले तर ईव्हीएम कसे हॅक होते त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवायला तयार असल्याचे सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.फक्‍त निवडणूक आयोगाने मॉक मशिन न देता प्रत्यक्ष मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम द्याव्यात असेही ते म्हणाले.

तर आदित्य यांचा राहुल गांधी होईल

शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्‍ट केले आहे. शिवसेनेने ही मागणी पुढेही रेटून धरली पाहिजे. अन्यथा आदित्य ठाकरे यांचाही राहुल गांधी होण्यास वेळ लागणार नाही, असा दावा आंबेडकर यांनी केला. मी मात्र मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.