बंगळुरू : कर्नाटकमधील जेडीएसचे माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या पाठोपाठ त्यांचे मोठे बंधू सुरज रेवण्णा यांनाही पोलिसांनी अटक केली. सुरज हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांच्या अटकेमुळे माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांच्या कुटूंबाच्या अडचणी आणखीच वाढल्याचे मानले जात आहे. प्रज्ज्वल आणि सुरज हे देवेगौडा यांचे नातू आहेत.
जेडीएसच्या 27 वर्षी पुरूष कार्यकर्त्याने 37 वर्षीय सुरज यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी सुरज यांच्या विरोधात अनैसर्गिक स्वरूपाच्या गुन्ह्याबद्दल कारवाईचे पाऊल उचलले. सुरज यांनी अटकेआधी त्यांच्यावरील आरोप फेटाळला. संबंधित कार्यकर्त्याने 5 कोटी रूपयांची खंडणी उकळण्यासाठी खोटी तक्रार दिल्याचा प्रत्यारोप सुरज यांनी केला. त्यावरून संबंधित कार्यकर्त्याविरोधातही पोलिसांनी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला.
सुरज यांच्या अटकेनंतर त्यांच्या बचावासाठी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार असणारे वडील एच.डी.रेवण्णा पुढे सरसावले. मुलावरील आरोप म्हणजे कारस्थानाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांचे दुसरे पुत्र प्रज्वल आधीपासूनच अटकेत आहेत. त्यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.