नागपूर – महाराष्ट्राची गुणवान धावपटू प्राजक्ता गोडबोले हिने करोनाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झालो आहोत, आता जगायचे तरी कसे. असा आर्त सवाल केला आहे. करोनाचे संकट आल्यापासून घर कसे चालवायचे हा प्रश्न होता. त्यातच वडील आजारी, आईची नोकरी गेली, माझा सराव थांबला, स्पर्धा स्थगित झाल्या आहेत त्यामुळे घरात कोणत्याही मार्गाने पैसा येत नाही.
रोजचे दोनवेळचे नव्हे तर एका वेळचे जेवणही कसे करायचे हा प्रश्न आहे. वडिलांवर उपचार करण्यासाठीदेखील घरात पैसे नाहीत. वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते, त्यांना अर्धांगवायुचा झटका आल्याने त्यांची नोकरी गेली. आई विविध कार्यक्रमांसाठी आचारी काम करायची. करोनामुळे सर्व समारंभ रद्द झाल्याने ती देखील बेरोजगार झाली आहे. करोनाचा धोका, देशात असलेले लॉकडाऊन यांमुळे आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे, असे देखील प्राजक्ताने व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राकडून एक धावपटू म्हणून प्राजक्ताने इटली मॅरेथॉन तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देशालाही विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवून दिली आहेत. तिच्या गावातील अनेक लोक त्यांना अन्नधान्य पुरवत आहेत, मात्र सरकार पातळीवर तिच्या अवस्थेकडे कोणी पाहणार आहे का आणि मदतीसाठी पुढे येणार का हाच खरा प्रश्न आहे.