साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानाने गोंधळ, विरोधकांची निदर्शने
नवी दिल्ली : लोकशाही सर्वोच्च मंदिर असणाऱ्या लोकसभेमध्ये महात्मा गांधी यांचे मारेकरी नथूराम गोडसेचा उल्लेख भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी “देशभक्त’ असा केल्याने एकच गदारोळ उडाला. विरोधकांनी निदर्शने करत आपला निषेध नोंदवला.
एसपीजी सुधारणा विधेयकावरील चर्चेत भाग घेताना द्रमुकचे ए. राजा यांनी सांगितले की, गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या का केली? त्यावेळी मध्येच उठून प्रज्ञासिंह म्हणाल्या, तुम्ही देशभक्ताचा उल्लेख करू नका.
राजा म्हणाले, गोडसेने स्वत:च कबूल केले आहे की त्याच्या मनात गांधीजींना मारण्याचे विचार हा हत्येचा कट रचण्यापुर्वी 32 वर्षापासून येत होते. गोडसेने गांधीजींची हत्या केली कारण तो एका विचारसरणीने प्रेरीत होता. प्रज्ञासिंह यांच्या हस्तक्षेपामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी निदर्शने करण्यास सुरवात केली. तर भाजपाच्या सदस्यांनी त्यांना शांत बसवले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी केवळ राजा यांचे निवेदनाचीच सभागृहाच्या कामकाजात नोंद करण्यात येईल, असे आदेश दिले.
राजा म्हणाले, संरक्षण हे धोक्याच्या स्वरूपावर असायला हवे. ते राजकीय भूमिकांवर आधारित असायला नको. त्यामूळे या विधेयकाचा गृहमंत्र्यांनी फेरविचार करायला हवा. या मुद्द्यावर कॉंग्रेसच्या गौरव गोगोई यांनी प्रज्ञासिंह यांनी माफी मागण्याची मागणी केली. हे विधान भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाला अनुसरून असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, यापूर्वीही प्रज्ञासिंग यांनी गोडसेला “देशभक्त’ म्हणाल्या आहेत. ज्यावरून मोठा वाद झाला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्यावर नाराजी व्यक्त करत पुन्हा कोणी अशी चूक केल्यास त्याला माफ केले जाणार नाही, असे म्हटले होते.
कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी. वेणुगोपाल यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा कायम उल्लेख करतात आणि वादग्रस्त असलेल्या साध्वीची संरक्षण सल्लागार समितीवर नियुक्ती केली जाते हा भाजपचा दुटप्पीपणा आहे.