ईडीच्या चौकशीला प्रफुल्ल पटेल गैरहजर

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आज सक्‍तवसुली संचलनालयाच्या चौकशीसाठी गैरहजर राहिले. काही वैयक्तिक कामामुळे आपण चौकशीला उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी “ईडी’ला कळवले होते. त्यानुसार “ईडी’ने त्यांना चौकशीसाठी पुढील आठवड्यात येण्यास सांगितले आहे. 10 किंवा 11 जून रोजी चौकशीसाठी हजर होण्याची सूचना “ईडी’ने पटेल यांना केली आहे.

विमान वाहतुक क्षेत्रातील प्रस्थ असलेल्या आणि “ईडी’ने काही काळपूर्वीच अटक केलेल्य दीपक तलवार यांना पटेल ओळखत होते, असा उल्लेख “ईडी’ने अलिकडेच दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे. 2004 ते 2011 या कालावधीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्याकडे नागरी विमान वाहतुक मंत्रालयाचा कार्यभार होता. त्यांचे नाव आरोपी म्हणून या आरोपपत्रामध्ये घेण्यात आलेले नाही.

या प्रकरणी सक्‍तवसुली संचलनालयाने विमान वाहतुक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि सरकारी विमान कंपन्यांमधील वरिष्ठ व्यवस्थापनापैकी अनेक व्यक्‍तींची यापूर्वीच चौकशी केली आहे. तलवार यांनी नोंदवलेला जबाब आणि दिलेल्या माहितीसंदर्भात पटेल यांची चौकशी केली जाणे अपेक्षित होते. पटेल यांचा जबाब “पीएमएल’ कायद्यांतर्गत नोंदवण्यात येणार आहे. आपण ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, असे पटेल यांनी सांगितलेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.