दिशा परिवाराच्या प्रयत्नांना ‘प्रभात’चीही साथ

गरजू विद्यार्थ्यांचे घेतले शैक्षणिक पालकत्व; शिष्यवृत्ती प्रदान

पुणे -“आर्थिक मदत देणे एवढीच दिशा परिवाराची भावना नसते. त्यातून मदत करणारे व मदत घेणारे दोघांमध्येही एक कौटुंबीक नातं तयार होतं. त्यातूनच भारत एकसंध होण्याचे आणि समाज घडविण्याचे काम होत असते. याची जाणीव सर्वांनी ठेवली, तर दिशा परिवाराचे काम आणखी प्रगतिपथावर जाईल,’ असा विश्‍वास दिशा परिवाराचे मार्गदर्शक व शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब जाधव यांनी व्यक्‍त केला.

दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यातील गरजू व गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात झाला. याप्रसंगी भाऊसाहेब जाधव बोलत होते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप, ज्येष्ठ मार्गदर्शक सुबोध म्हात्रे, चार्टर्ड अकाउंटंट सुनील पाठक, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, तसेच कृष्णा महाडिक, दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माणिकराव गोते, दिशा परिवार शिष्यवृत्ती प्रदान समारंभ समितीचे अध्यक्ष नंदकिशोर रोजेकर, कार्याध्यक्ष पूर्णिमा जानोरकर, दिशा परिवारचे आधारस्तंभ राजाभाऊ चव्हाण, अरुण कुलकर्णी, डॉ. मोहन भोई, अल्पना चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. दैनिक “प्रभात’ परिवारातील अशोक गांधी चॅरिटेबल ट्रस्टनेही यंदा 22 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.

जाधव म्हणाले, “दिशा परिवाराने एक तप पूर्ण केलं आहे. कमी कालावधीत ही मोठी वाटचाल केली आहे. यात मदत देणारा व घेणारा यांच्यातील अंतर कमी करून गरजूंना आर्थिक पाठबळ देण्याचे मोठे काम दिशा परिवारातून होत आहे. विद्यार्थ्यांना विशिष्ट वेळेला मदत मिळाली नाही तर चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. तर योग्य वेळी योग्य मदत मिळाली तरी विद्यार्थी योग्य मार्गाकडे जातात. प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या देणगीदारांची भूमिका निश्‍चितच महत्त्वाची आहे.’

“मदत करणारे व घेणारे दोघंही केवळ आर्थिक मदत या एवढ्या कारणावरून एकत्र येतात असे नाही. तर त्यांच्यात नेहमी शैक्षणिक वाटचालीवर चर्चा होते. तसेच कोणताही जातीभेद न मानता ही मदत दिली जाते. त्यामुळे कोणत्याही शंकेला इथे वाव नाही. एकूणच समाजामुळे मोठे झालो आहोत, ही भावना सर्वांनी ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांनीही कुणाच्या तरी मदतीमुळे आपण मोठं होत आहोत, ही जाणीव ठेवा,’ असेही जाधव म्हणाले. “एक व्यक्‍ती आयुष्यात काय परिवर्तन करू शकतो,’ याचे दाखले देत अरविंद जगताप यांनी विद्यार्थ्यांना आशावादी बनण्याचे आवाहन केले. मार्गदर्शन करणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र प्रत्यक्ष कार्य करणारे फारच कमी असतात. त्या अनुशंगाने दिशा परिवारचे कामही महत्त्वाचे आहे. आपण गरजूंसाठी काय करू शकतो, असा विचार करणे आवश्‍यक आहे. परिवारच्या नव्या वसतिगृहात झाडांची व्यवस्था व ग्रंथालयासाठी पुस्तक देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मुलांच्या वसतिगृहासाठी विचार करावा : पाठक
दिशा परिवाराने गरीब व गरजू मुलींच्या वसतिगृहासाठी अद्ययावत वास्तू उभारली आहे. त्यामुळे पुण्यात मुलींची राहण्याची समस्या मिटली आहे. तसाच प्रश्‍न मुलांचाही आहे. त्यामुळे दिशा परिवारने आता मुलांच्या वसतिगृहासाठीही विचार करावा, अशी अपेक्षा सुनील पाठक यांनी व्यक्‍त केली.

प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा : खळदकर
अन्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मदतीसाठी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन देणगीदार राजन खळदकर यांनी केले.

तर, नंदकिशोर रोजेकर यांनी प्रास्ताविक केले आणि दिशा परिवारची भूमिका मांडली. पूर्णिमा जानोरकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. अल्पना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अरुण कुलकर्णी यांनी आभार मानले.

अशोक गांधी चॅरिटेबल ट्रस्टने दिली 22 विद्यार्थ्यांना नवी “दिशा’
दैनिक “प्रभात’च्या अशोक गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यंदाच्या वर्षी 22 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. दैनिक “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 5 लाख 5 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांत नर्सिंग, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दिशा परिवाराच्या मदतीने माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले आहे. आता पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले असून, मी पण आता गरजू विद्यार्थ्यांना मदत करणार आहे. इथे केवळ आर्थिक मदत मिळते, असे नाही. तर दिशा परिवारामुळे आत्मविश्‍वास आणि एक प्रकारची हिंमत प्राप्त होते.
– राजश्री वाघ, विद्यार्थिनी, नाशिक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)