पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
रस्ता दुभाजकाची दुरवस्था
पिंपरीगाव -येथील काटे पिंपळे मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने रस्ता दुभाजकाचे कठडे तुटल्याने येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दुभाजक तुटलेल्या ठिकाणाहून भीमनगरकडे रस्ता जातो. कोपऱ्यावरच दुभाजक तुटल्याने वाहनांना अपघात होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यापासून दुभाजक तुटला आहे. परंतु संबंधित विभाग याकडे लक्ष देत नाही. तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन रस्ता दुभाजक दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
– बी. एन. राजे, पिंपरी
विद्यानगर परशुराम चौकात पथदिवे बसवा
चिंचवड -विद्यानगर परशुराम चौकात मागील काही वर्षांपासून दोन पथदिवे अज्ञात वाहनाच्या धडकेने कोसळले होते. पिंपरी-चिंचवड महापालिका विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी पाहणी करून विद्युत पोल जमा करून घेतले. परंतु अद्याप या ठिकाणी विद्युतपोल बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्री येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या पलीकडील बाजूला कचराकुंडी आहे. तेथे पहाटे कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलांना वाहनाचा अंदाज न आल्यामुळे वेळोवेळी किरकोळ अपघात घडत आहेत. येथे मोठा अपघात अथवा घटना घडण्यापूर्वी पालिकेने तातडीने पथदिवे बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
– विठ्ठल बाबुराव कळसे, सामाजिक कार्यकर्ते
काटेनगरला पाणी समस्या कायम
चऱ्होली – येथील काटे नगर, चोवीसावाडी येथे पाणीटंचाईची समस्या कायम आहे. येथे पाणीपुरवठा नियमित होत नाही. तसेच पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भंटकती करावी लागत आहे. पाण्यासाठी परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याची त्वरित दखल घेऊन येथील पाणीटंचाईची समस्या सोडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.