पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
भोसरीतील रस्ता दुभाजकाला मुहूर्त कधी?
भोसरी – इंद्रायणीनगर, भोसरी येथील तिरुपती बालाजी चौकातील रस्ता दुभाजक गेल्या अनेक महिन्यांपासून उखडून ठेवला आहे. तो लवकर उभारावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.रस्ता दुभाजकामुळे अपघात कमी होतात. तसेच नागरिकांना रस्ता ओलांडणेही सोयीस्कर होते. म्हणून महापालिकेने महत्त्वाच्या मोठ्या रस्त्यांवर दुभाजक उभारले आहेत. इंद्रायणीनगर, भोसरी येथील तिरुपती बालाजी चौकात असलेला रस्ता दुभाजक गेल्या काही महिन्यांपूर्वी काढण्यात आला. त्यामुळे या रस्त्यावर केवळ मातीचा ढीग शिल्लक राहिला आहे. या ढिगातील माती रस्त्यावर येऊन दुचाकी वाहने घसरून पडत आहेत. याशिवाय येथील झाडांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे महापालिकेने येथील रस्ता दुभाजक लवकर उभारावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
भोसरी उड्डाणपुलाखाली घाणीचे साम्राज्य
भोसरी – पुणे-नाशिक महामार्गावर पिंपरी चिंचवड महापालिकेने उड्डाणपूल उभारला आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे या पुलाखाली घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भोसरी येथील उड्डाणपुलाखाली वाहने पार्क केली जातात. तसेच या पुलाखाली काही फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. सायंकाळनंतर पुलाखाली अंडाबुर्जीच्या गाड्या लागतात. या गाड्यांवर येणारे काही ग्राहक दारूही पितात. तसेच पुलाच्या कॉलमजवळ कोपऱ्यावर हे मद्यपी लघुशंकाही करतात. यामुळे या भागात दुर्गंधी निर्माण झाली आहे. महापालिकेचा आरोग्य विभागही येथील घाणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना या भागातून जाताना नाकावर रूमाल धरून जावे लागते. पुलाखालील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यास येथील घाणीचा प्रश्न मार्गी लागेल.
बसथांब्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
भोसरी -प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी ठिकठिकाणी बसथांबे उभारते. भोसरी येथील पीएमपीच्या थांब्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली आहे. भोसरी येथे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सावित्रीबाई फुले शाळा आहे. या शाळेच्या समोर असलेल्या पीएमपीच्या बस थांब्यावर येथील फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. याशिवाय शाळेच्या भिंतीलगतही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. संपूर्ण पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून वाहनांच्या गर्दीतून रस्त्यावरूनच चालावे लागते. येथील फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पादचाऱ्यांना रोलचा अडथळा
चिंचवड -पादचाऱ्यांना चालण्यासाठी चिंचवड परिसरात महापालिकेने मोठा पदपथ उभारला आहे. मात्र, या पदपथावर केबलचा रोल गेल्या अनेक महिन्यांपासून पडून आहे. या भागातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना रोलचा अडथळा होत आहे. चापेकर चौक, चिंचवड ते काळेवाडी पूल या रस्त्याचे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून कॉंक्रिटीकरण केले आहे. याच कामात पदपथही मोठे करून त्याचे सुशोभीकरण केले आहे. या भागात केबलचे काम करण्यासाठी रोल आणण्यात आला होता. केबलचे काम झाल्यावर हा रोल कित्येक महिन्यांपासून पदपथावरच पडून आहे.