विद्युत रोहित्रा शेजारी वाढली झुडपे
चिंचवड – विद्युत रोहित्राच्या बाजूला केरकचरा टाकू नका. त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते, असे आवाहन महावितरणकडून वारंवार नागरिकांना केले जाते. मात्र शहरातील विद्युत रोहित्रांकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. बिजलीनगर, चिंचवड येथे असलेल्या विद्युत रोहित्राच्या बाजूला झाडे झुडपे वाढलेली आहेत. येथील गवत सुकले आहे. जर विद्युत रोहित्रातून निर्माण झालेली ठिणगी या ठिकाणी पडल्यास आग लागू शकते. त्यामुळे महावितरणने विद्युत रोहित्राच्या आसपासची झाडे झुडपे काढून टाकावीत.
– यादव बोरले, बिजलीनगर, चिंचवड
भंगाराची धोकादायक वाहतूक
पिंपरी – एका माल वाहतूक टेम्पोमधून लोखंडी बर (कचरा) याची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे या लोखंडी कचऱ्यावर कोणत्याही प्रकारचे झाकण ठेवण्यात आलेले नव्हते. या लोखंडी कचऱ्याचे कण हवेत उडून एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातही जाऊ शकतात. मात्र चालकाने याबाबत कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आले. या टेम्पोच्या मागील बाजूची लाइट बंद होती. वाहनाचा क्रमांकही मार्कर पेनने टाकल्यामुळे तो सहसा दिसून येत नव्हता. अशा प्रकारच्या धोकादायक वाहतूकीला आळा कोण आणि कधी बसविणार?
– बी. एन. राजे, पिंपरी
बस थांब्यावरील जाहिरातींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
मोशी – ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे महापालिकेच्या उत्पनात भर पडते. विना परवाना लावण्यात आलेल्या जाहिराती महापालिका काढून टाकते किंवा संबंधित जाहिरातदाराकडून दंड वसूल करते. बस थांब्यावरही पीएमपीएमएलकडून जाहिरात लावण्यासाठी शुल्क आकारले जाते. मात्र, सध्या संबंधित प्रशासनाकडून फुकट्या जाहिरातदारांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महापालिका आणि पीएमपीएमएलचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. एमआयडीसी मोशी येथील स्पाईन सिटी चौकातील बस थांब्यावर अशाच प्रकारे एका बांधकाम व्यावसायिक आणि हॉटेल चालकाने जाहिराती लावल्या आहेत. या मोठ्या आकाराच्या जाहिरतींमुळे बस थांबाही झाकाळून गेला आहे.
– स्थानिक नागरिक, मोशी
काटेपूरम चौकात बसथांबा उभारावा
पिंपळे गुरव – काटेपूरम चौक, पिंपळे गुरव या ठिकाणी पूर्वी एक बसथांबा होता. एप्रिल 2020 मध्ये झालेल्या अवकाळी पावसात येथील झाड बस थांब्यावर पडल्याने बसथांबा मोडला. त्यानंतर या भागातील रस्त्याचे काम सुरू झाले. आता रस्त्याचे काम पूर्ण झाले असून बससेवाही पूर्ववत झाली आहे. मात्र मोडलेल्या बस थांब्याच्या ठिकाणी अद्यापही नवीन थांबा उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे महिला, वृद्ध नागरिक यांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागात पुन्हा थांबा उभारावा.
– प्रदीप गायकवाड, पिंपळे गुरव