पुणे – समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून, समर्पित वृत्तीने, स्वान्तसुखाय कार्य करत राहणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान दैनिक प्रभातच्यावतीने करण्यात आला. ‘प्रभात नारीसन्मान 2023′ हा सोहळा नुकताच पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. हा कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर देखील प्रसारित केला जाणार आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्वाबरोबर सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा हा सन्मान आता तुम्हालाही पाहता येणार आहे. अतिशय नेटकेपणाने आणि संगीतमय वातावरणात पार पडलेला हा नारी सन्मान सोहळा महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांसाठी 25 मार्च रोजी प्रसारित केला जाणार आहे.सकाळी 10:30 वाजता,दुपारी चार वाजता आणि रात्री नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवरती हा सोहळा दाखवला जाणार आहे.
“माणिकचंद ऑक्सिरीच’ प्रस्तुत या कार्यक्रमाला “महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप सोसायटी लि. पुणे’, “प्रकाश मसाले-मसाला महाराष्ट्राचा’, “वैद्य नानल्स आयुर्वेद’ यांचे सहप्रायोजकत्व लाभले होते. याशिवाय डिजिटल पार्टनर -डिजिटल प्रभात यांचेदेखील सहप्रायोजकत्व होते.
12 जणींना “सुपर वुमन’ पुरस्कार
“प्रभात नारीसन्मान 2023′ सोहळ्याच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सांगीतिक प्रवासावरील “आशा दि व्हर्सेटाइल लिजंड’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामधूनच थोडासा “ब्रेक’ घेऊन नारीसन्मान सोहळा झाला. यामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या मालती दाते आणि साताऱ्याच्या डॉ. पल्लवी साठे-पाटोळे, “पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती’च्या समन्वयक आरती गोखले, देवदासींच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या अलका गुजनाळ आणि बालगुन्हेगारी समुपदेशक म्हणून कार्य करणाऱ्या भाग्यश्री साळुंखे यांचा “सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते “प्रभात नारीसन्मान 2023′ देऊन सन्मान करण्यात आला.
याशिवाय 12 जणींना “सुपर वुमन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये जयश्री सातव-पाटील, उज्ज्वला बांदल, डॉ. कल्याणी गेलडा, वैद्य उषा आशुतोष नानल, आशा भोंग, राजश्री-प्रीती-श्रद्धा, शुभांगी लोणकर, नंदिता शहा, डॉ. प्रियंका महाजन-राऊत, कल्याणी वाघमोडे, सुप्रिया बांदल, वैशाली जगदाळे यांचा समावेश होता. या पुरस्काराच्या वितरणानंतर “आशा दि व्हर्सेटाइल लिजंड’चा उर्वरित कार्यक्रम पार पडला.