प्रभात किरणे : …तो पाऊसच असतो!

पाऊस… निसर्गाचा एक सुंदर आविष्कार… भावविभोर होऊन केकावलीचे सूर ऐकायला लावणारा आणि त्याला पार्श्वसंगीत असते ते टिपटिपणाऱ्या किंवा अखंड बरसणाऱ्या मृदंगधारांचे… निसर्गाचा हा खेळ आपल्या सर्वांनाच माहीत आहे… मोहवणारा आहे… कधी कधी नकोसा वाटणाराही; पण तरीही प्रत्येक वर्षी चातकच नाही तर आपण सर्वजणही कोणाची वाट पाहात असू तर तो पाऊसच असतो!
जलद काळे होऊन आसमंत व्यापू लागले की, सहज मन हुरहुरायला लागते… मग तो पहिला पाऊस… मे महिन्याच्या शेवटी कधीतरी बरसतो. तापलेल्या मातीला थंड करीत एक सुगंध देऊन जातो. मृदगंध… त्यानंतर पुढील काळात चार महिने बरसतच असतो… या पावसालाही पंचेंद्रियांची आस आहे… आणि म्हणूनच तो सहज अनुभवतो… प्रत्येक ऋतूचेच असे आहे; पण पाऊस… निसर्गदात्याचे एक वेगळेच रसायन आहे. सृष्टीच्या पुनर्निर्मितीचा आणि कृषिवली फुलण्याचा आणि निसर्ग समृद्ध करणारा हा काळ.
पाऊस येतो… वेगवेगळे अंदाज घेऊन, वेगवेगळी रूपं घेऊन… सृष्टी हिरवीगार होते; पण या हिरव्या रंगांच्या असंख्य च्छटांनी ती बहरते… पावसाच्या पाण्याचा रंगही… निसर्गाच्या रंगाप्रमाणे होतो. कुठे मातीच्या लालसर रंगाचा… तर कुठे फेसाळणारा… कुठे होतो तो निसळसर, तर कुठे हिरवा… सायंकाळची सोनेरी किरणं चुकार ढगातून पसरली तर या लालसर-सोनेरी रंगांचा पाऊस आपले वेगळेच अस्तित्व दाखवून जाते.
पाऊस सुखावणारा तर आहेच; पण कधी तो “रूद्र’ होतो. त्यांच्या असंख्य जलधारांनी तो तांडव करतो आणि मग माळीण किंवा इर्शाळवाडीतील त्याचे ते रूप घाबरवून टाकतं… डोळ्यांतील धारा आणि पाऊसधारा एक होतात. वळवाच्या रुद्रापासून सुरू होणारं त्याचं रूप दामिनीच्या अस्तित्वात एकवटतं आणि अश्विनात हस्त नक्षत्रात पुन्हा तेच रूप दाखवून त्या वर्षापुरतं थांबतं. कधीतर अवकाळीच्या रूपानं अधूनमधून तो अवतरतो… पण त्याचा तो सुखावह वाटणारा अंदाज वर्षाऋतूतच. म्हणूनच म्हणावेसे वाटते-
आषाढ म्हणती कोणी तुला
कोणी मृगाच्या अतिव धारा
नभाच्या अंतरंगात लपलेला
तू अधीर ऋतुगंधातला मोरपिसारा…
मिलन म्हेत्रे





