पुणे – करोनाच्या तिसऱ्या लाटेचा शहराला धोका असल्याने महापालिकेकडून यंदा शहरात गणेशमुर्ती विसर्जनासाठी शहरात सार्वजनिक ठिकाणी विसर्जन हौदांची सुविधा असणार नाही.
त्याला पर्याय म्हणून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी पालिकेकडून प्रत्येकी 4 फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, हे हौद कुठे असतील आणि त्याचा फिरण्याचा मार्ग काय असेल, या हौदांची माहिती देणारा संपर्क क्रमांक कोणता असेल त्याबाबत कोणतीही माहीती पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली नसल्याने विसर्जनाच्या नियोजनाचा गोंधळ समोर आला आहे.
याबाबतचे वृत्त दैनिक प्रभात मध्ये प्रकाशित होताच; त्याची गंभीर दखल घेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना तातडीनं विसर्जन नियोजनाची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात आज दिड दिवसांच्या गणेशमुर्तीचे विसर्जन होते. मात्र,या गाडया नेमक्या कुठे आहेत. विसर्जन कुठे होणार याची कोणतीही कल्पना नसल्याने अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला, त्यातच, महापालिकेसा शासकीय सुट्टी असल्याने अनेक पालिका कर्मचाऱ्याकडून तसेच अधिकाऱ्यांकडूनही त्याला कोणताही प्रतिसाद देण्यात येत नसल्याचे चित्र होते.
दरम्यान, प्रशासनाकडून केलेली तयारी केवळ कागदावरच असल्याचे समोर आल्याने दिड दिवसाच्या विसर्जनाचा गोंधळ होणार असल्याचे वृत्त दैनिक प्रभातने “पुणेकरांकडून अपेक्षा ; नियोजनाचा मात्र ठणठणाट’ या मथळयाखाली दिले होते.
त्याची गंभीर दखल थेट महापौरांनी घेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधून तातडीनं ठरल्या प्रमाणे तातडीनं विसर्जन नियोजनाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार, सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही महापालिका आयुक्तांकडून तातडीनं अंमलबजावणीच्या सूचना दिलेल्या आहेत.