Prabhat Effect: महिला शिक्षकांबाबतचा ‘तो’ आदेश अखेर बदलला

नगर: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ज्या महिला शिक्षकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत ते सर्व बदलून त्यांच्या जागी पुरुष शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येतील. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जिल्ह्यातील सर्व निवडणूक अधिकार्‍यांना दिले. दैनिक प्रभातने याविषयावर सतत प्रकाश टाकत लक्ष वेधले होते.

दैनिक प्रभातने याविषयावर प्रकाश टाकल्यानंतर राज्य प्राथमिक शिक्षक संघ, राज्य प्राथमिक शिक्षण परिषद व राज्य शिक्षक समितीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील व  निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांची भेेट घेवून सदर निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांसह संबंधीतांनी हा निर्णय बदलला जाईल असे आश्‍वासन दोन दिवसापूर्वी दिले होते. त्यानंतर त्यांनी संबंधीत मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना महिला शिक्षकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष नेमू नये असे आदेश दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी यंदा प्रथमच महिला शिक्षिकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष नेमणुकीचे आदेश देण्यात आले होते. सदरचे काम जोखमीचे व महिलांसाठी गैरसोयीचे असल्याने याबाबत जिल्ह्यातील महिला भगिनींनी तीव्र नाराजी व्यक्त करून सदर आदेश बदलण्याची मागणी केली होती. यासंदर्भात जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष बापू तांबे व त्यांचे सहकारी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले व त्यांचं सहकारी व राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य संपर्क प्रमुख संजय कळमकर व त्यांच्या सहकार्‍यांनी  सदर अधिकार्‍यांची भेट घेतली होती.

महिला शिक्षकांना मतदान अधिकारी दोन किंवा तीन क्रमांकाची ड्युटी द्यावी व सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष म्हणून प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या पुरुष शिक्षकांना ज्यांना अद्याप आदेश देण्यात आलेले नाहीत त्यांच्या नियुक्त्या कराव्यात व महिलांची गैरसोय टाळावी अशी विनंती करण्यात आली होती.

मतदान केंद्राध्यक्ष यांची कामे अडचणीचे व रात्री उशिरापर्यंत चालणारे असल्यामुळे महिला कर्मचार्‍यांची मोठी गैरसोय होणार आहे. या बाबीकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी या प्रश्नी योग्य ते बदल करून ज्या महिला शिक्षिकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्षाची नेमणूक देण्यात आली आहे ती बदलण्यात येईल असे आश्वासन संबंधीतांनी दिले होते.  राज्यात फक्त नगर जिल्ह्यात अशा पद्धतीने नेमणुका देण्यात आल्याने महिला वर्गाने नाराजी व्यक्त केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)