आळंदी – “ऐतिहासिक सिद्धबेट जलपर्णीच्या विळख्यात’ या मथळ्याखाली 30 डिसेंबर 2022 रोजी दैनिक “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली अन् स्वच्छतेच्या कामासंदर्भात बैठकांना जोर आला. तर नुकतीच सिद्धबेट परिसराच्या विकासास सुरुवात झाल्याने भाविकांनी “प्रभात’चे आभार मानले आहेत.
तीर्थक्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी आहे.
येथे कार्तिकी एकादशी, आषाढी एकादशी वारी सोहळा, महिन्याच्या एकादशींच्या वेळी हजारो भाविक संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी येत असतात. अशावेळी भाविक माऊलींच्या दर्शनानंतर आळंदीतील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेटी देतात. माऊलींचे संजीवन समाधी मंदिरानंतर दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे कुटुंब राहत असलेले घर सिद्धबेट आहे; मात्र अनेक वर्षांपासून हे विकासापासून वंचित आहे.
येथिल अस्वच्छतेमुळे भाविक याठिकाणी येण्यास धजावत नाहीत. 2014 मध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत करोडो रुपये खर्चून येथे विकास करण्यात आला मात्र त्यानंतरही येथे अस्वच्छता आणि अवैध प्रकार सुरुच राहिले. 30 डिसेंबर रोजी याबाबत “प्रभात’मध्ये येथील वास्तवाबाबत वृत्त प्रसारीत करण्यात त्यानंतर नवनियुक्त मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पदभार स्वीकारताच प्राधान्याने येथील स्वच्छता उपक्रम हाती घेऊन विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे.
सिद्धबेट हे इंद्रायणी नदीच्या तीरावर आहे. येथे जास्त लोक येत नसल्याचा फायदा घेत काही अपप्रवृतीचे लोक येथे मद्यपान तसेच इतर गैरप्रकार करतात असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी याठिकाणी दोन शिफ्टमध्ये नगरपरिषदेकडून सुरक्षारक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे.
निवारा शेड होणार बहुउद्देशिय हॉल
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सिद्धबेटात भव्य असे भाविकांसाठी निवारा शेड उभारले आहे; मात्र त्याचा भाविकांना कोणताही उपयोग होत नाही. त्याच्या आजुबाजूला मोठ्या प्रमाणात गवत होते. तसेच शेडमध्येही अस्वच्छता आहे. नगरपरिषदेकडून आता येथील गवत काढण्यात आले असून परिसर स्वच्छ केला जात आहे.
तसेच या निवारा शेडचे बहुउद्देशीय हॉलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. नगरपरिषदेने ठरवलेली रक्कम भरून ते नागरिकांना कार्यक्रमांसाठी, उपक्रमांसाठी वापरण्यास दिले जाणार आहे. येत्या 6 महिन्यांमध्ये हे काम होणे अपेक्षित आहे.
प्रवेशद्वाराजवळ बसवणार एलईडी स्क्रीन
सिद्धबेट पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना या भूमीबाबत माहिती मिळावी यासाठी नगरपरिषद आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयुक्त माध्यमातून प्रवेशद्वाराजवळ मोठे एलईडी बोर्ड लावण्यात येणार आहेत. तसेच इतरही आवश्यक सोयी सुविधा करण्यात येणार आहेत.
चला एक पाऊल सिद्धबेटाकडे
गेल्या काही वर्षांपासून सिद्धबेटात सामाजिक संस्थांकडून वेळोवेळी उपक्रम राबवून वृक्षारोपण केले जात आहे. तसेच वाढदिवस, संताच्या पुण्यतिथी आदी औचित्य साधून उपक्रम राबविले जातात. तसेच आता “चला एक पाऊल सिद्धबेटा’कडे ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतून येथे नागरिकांचा सहवास वाढल्यास स्वच्छता कायम राहिल आणि अपप्रवृत्तीला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.
आळंदीत बदली होण्याआधीच सिद्धबेटातील समस्येची माहिती मिळाली होती. येथील संपूर्ण परिसर स्वच्छ केला जात आहे. निवारा शेडचा उपयोग बहुउद्देशीय हॉलसाठी केला जाणार आहे. अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहे. इंद्रायणी स्वच्छतेबाबतही उपाययोजना करण्यात येणार असून जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. सिद्धबेट स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, आळंदी