बिबवेवाडी (हर्षद कटारिया) – महापालिकेच्या सर्वच क्रीडा संकुलातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिले असतानाच या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या आहेत. क्रीडा विभाग उपायुक्त रंजना गगे यांच्याकडून चार्ज काढून तो उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
तळजाईवरील योग महर्षी रामदेवबाबा क्रीडा संकुल तसेच सहकारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील गैरप्रकाराबाबत “प्रभात’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संकुल भाडेतत्त्वावर देण्याबाबतच्या निविदा प्रक्रियेला वेग आला आहे.
महापालिकेच्या सर्वच क्रीडा संकुलातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याने तशी माहिती घेतली जात आहे. शहरातील अनेक क्रीडा सुंकलांत माजी-आजी नगरसेवकांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांकडून असे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर येण्याची तसेच यातून अनेक नावे समोर येण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाकडे अनेकांची लक्ष लागले आहे, त्यातच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याने यातील गूढ वाढले आहे.
माझ्याकडे अनेक विभागाची कामे होती, त्यामुळे कामाचा जास्त भार होता; त्यामुळे मीच क्रीडा विभागचा चार्ज इतर अधिकाऱ्यांना द्यावा, असे सांगितले होते. त्यामुळे सदर पदभार वारुळे यांच्याकडे देण्यात आला आहे. नव्या अधिकाऱ्यांचा मोबाइल क्रमांक माझ्याकडे नाही.
– रंजना गगे, उपायुक्त क्रीडा विभाग, पालिका (तत्कालीन)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील गैरप्रकाराबाबत माहिती घेतली नाही. याबाबत नवीन उपायुक्तांकडून माहिती घेतली जाईल. शहरात 74 क्रीडा संकुल असून त्यातील किती संकुलाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत किंवा किती संकुले बंद आहेत, याची माहिती मला नाही.
– ज्ञानेश्वर मोळक, महापालिका अतिरिक्त आयुक्त (विशेष)
क्रीडा संकुलचे टेंडर संपल्यानंतर जाणीवपूर्वक पुढील टेंडर काढत नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदार अथवा इतर इसम अनधिकृतपणे पैसे गोळा करत राहतात. त्यामुळे महानगर पालिकेचे उत्पन्न कमी होते. यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी जे वेळेत टेंडर काढत नाहीत, अलाउंटमेंट करत नाहीत आणि भाडेवसुली करीत नाहीत, अशा संबधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई तातडीने करणे गरजेचे आहे. – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच