आवाहन करोना या गंभीर साथरोगाला थोपवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. शासन आणि प्रशासनानं सर्वच पातळ्यांवर खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर आपणही काही संकेत पाळणं महत्त्वाचं आहे. यात प्रामुख्यानं सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येणं, धार्मिक स्थळं-मॉल्स अशा ठिकाणी गर्दी न करणं, असे साधे उपाय आपण करू शकतो.
प्रशासनानं केलेल्या आवाहनानुसार आपण जर सामाजिक संकेत, शिष्टाचार आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता पाळली, तर करोना या विषाणूचा प्रसार आपण थोपवू शकतो. आपलं, आपल्या कुटुंबाचं आणि सार्वजनिक आरोग्य टिकून राहण्यासाठी प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक झालं आहे.
बाजारपेठा, दुकाने आणि इतर व्यावसायिकांनी आता स्वयंस्फूर्तीनं बंद पाळला आहे. शाळा-महाविद्यालयेदेखील बंद आहेत. त्यामुळे या परिस्थितीत आपणही यात सहभागी होऊन करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पाऊल उचलणं गरजेचं आहे.
सध्या वातावरणही बदलत आहे. त्यामुळे आपल्या घरातील लहान मुलं, ज्येष्ठ आणि वयोवृद्धांची काळजी घ्यावी. आत्यंतिक गरज असेल, तरच घराबाहेर पडावे. प्रकृतीबद्दल काही शंकास्पद वाटल्यास तातडीनं आपल्या नियमित डॉक्टरांचा सल्ला आणि वेळीच उपचार घ्यावा. असे साधे आणि सोपे उपाय केल्यास या गंभीर साथीला आपण निश्चित हद्दपार करू शकतो.