67 वर्षांपूर्वी प्रभात : मंगळवार ता. 4 माहे ऑगस्ट सन 1953

डॉ. शामाप्रसाद यांच्या निधनानिमित्त लोकसभेचें काम तहकूब 

नवी दिल्ली, ता. 3 : भारतीय लोकसभेचे अधिवेशन आज सकाळी सुरू झाले आणि डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या शोचनीय निधनानिमित्त आजच्या पुरते तहकूब झाले. आज लोकसभेत कसलेहि काम झालें नाहीं. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या शोचनीय निधनानिमित्त दुखवटा व्यक्‍त करणारा ठराव कॉंग्रेस पक्षाचे नेते व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.

ठराव मांडतांना पंडित नेहरू म्हणाले, “”डॉ. मुखर्जींचें निधन अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत झालें. ताज्या घडामोडीत डॉ. शामबाबूंनी मोठा वाटा उचलला होता व अशा एका मोठ्या व्यक्‍तीला आपण मुकलों आहोंत. तसे पाहिलें तर डॉ. शामा प्रसाद वयानें चांगलेंच तरुण होतें व जीवनाचा त्यांना अद्यापि बराच मोठा पल्ला गाठावयाचा होता. पण तसें घडलें नाहीं.” भारतीय लोकसभेचें एक जुनें सभासद पंडित लक्ष्मीकांत मैत्र व जुन्या मध्यवर्ती विधिमंडळाचें सभासद सर अब्दुल गझनवी यांच्या निधनानिमित्तहीं लोकसभेनें आज दुखवट्याचें ठराव मंजूर केले व सभागृहाचे काम आजच्यापुरतें तहकूब झालें. लोकसभेची बैठक संपण्यापूर्वी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, श्री. लक्ष्मीकांत मैत्र सर अब्दुल गझनवी यांना श्रद्धांजलीं वाहण्यासाठीं सर्व सभासद उठून उभे राहिलें व त्यांनी दोन मिनिटें शांतता पाळलीं.

स्वतंत्र आंध्र राज्याचे पं. नेहरू उद्‌घाटन करणार

दिल्ली, ता. 3 : स्वतंत्र आंध्र राज्याचे उद्‌घाटन करण्याचें पंतप्रधान पं. नेहरू यांनी मान्य केल्याचे वृत्त आहे. कॉंग्रेस व प्रजा-समाजवादी पक्षाचे नेत्यांनीं केलेल्या विनंतीस अनुसरून पंडितजींनीं ही अनुमती दिल्याचें कळतें. आंध्र राज्य 1 – ऑक्‍टोबरला साकार होईल.

हंगामी राजधानीचा प्रश्‍न पुन्हा चर्चेला घ्या

दरम्यान, हंगामी राजधानीचा प्रश्‍न पुन्हा उकरून काढण्याचें प्रयत्न चालू असून या प्रकरणीं मतदान न करणाऱ्या मद्रासच्या 7 आंध्रींय खासदारांनी हा प्रश्‍न चर्चेला घेण्याची नेहरूंना विनंतीं केली आहें.

प्रो. रंगांच्या हालचाली

कृषिकार लोक पक्षाचें नेते प्रो. एन. जी. रंगा हे आंध्रींय खासदारांना भेटून आंध्र बिलाचें चर्चेचे वेळी लोकसभेंत हा प्रश्‍न उपस्थित करण्याचें दृष्टिनें प्रयत्न करीत आहेत. मद्रास विधिमंडळात या प्रकरणीं जे मतप्रदर्शन झालें त्याची लोकसभेंने कदर करावी, असें रंगांचे म्हणणें आहे.

टी. प्रकाशम्‌-नेहरू भेट; देण्याघेण्यासाठीं कमिशन

प्रजासमाजवादी नेते टी. प्रकाशम्‌ व विश्‍वनाथन्‌ यांनीं नेहरू यांची भेट घेऊन आंध्राचीं देणीघेणी यांची विभागणी करण्यासाठीं एक फायनान्स कमिशन नेमण्याचीं सूचना केलीं.

Leave A Reply

Your email address will not be published.