ट्रीस्ट-प्रकरणानें युरोपचें रणांगण रक्तानें रंगणार काय?
बेलग्रेड, ता. 6 : “”लष्करी बळाच्या जोरावर ट्रीस्टचा “ब’ वर्गातील प्रदेश युगोस्लाव्हियाला जोडण्याची गरजच काय? आमचें सैन्य त्या भागांत त्रिराष्ट्र करारान्वयें आहेंच; अर्थातच जो भाग आमच्या ताब्यातच आहें, त्याभागासाठी लष्करी बळ खर्च करण्याची आमची इच्छा नाही; खेरीज आम्हाला आमचें धोरण जबाबदारीनें आखलें पाहिजें,” अशा अर्थाचें उद्गार युगोस्लाव्हियाचें अध्यक्ष मार्शल टिटो यांनी आज केलेल्या महत्त्वाच्या भाषणांत काढलें. मार्शल टिटो यांचे भाषण ऐकण्यासाठीं उत्सुकतेने साऱ्या जगाचे पंचप्राण श्रवणेंद्रियांत गोळा झालें होतें.
इटलीचा पराभव…
मा. टिटो यांचे हे भाषण ऐकण्यासाठी सुमारें दोन लाखांच्यावर श्रोतृसमुदाय जमला होता. मार्शल टिटो पुढे म्हणाले, “”मात्र ट्रीस्टचा “ब’ वर्गीय प्रदेश इटली जर लष्करी बळावर गिळण्याचे मांडे मनांत रचित असेल, तर इटलीचे लाड आम्ही कधीच खपवून घेणार नाही. दुसऱ्या महायुद्धात इटलीचा पराभव झाला आणि या भागांतून इटलीची हकालपट्टी झाली. पण खरें म्हणजे इटलीनें हा प्रदेश गमावला असें काहीच नाहीं. तो मूळचा आमचाच प्रदेश होता. मग इटलीनें आम्हाला दमधमक्या देण्यांत काय अर्थ? ट्रीस्टचा प्रश्न इटलीबरोबर वाटाघाटी करून सोडविण्यास युगोस्लाव्हिया नेहमीच तयार आहें.
टिटोची खडी फौज…
पण याचा अर्थ असा नव्हे कीं, युगोस्लाव्हिया इटलीच्या लष्करी बळाला वचकून आहे. इटलीनें लष्करी हालचाली केल्या आहेत, पण त्यामुळें एखादी ठिणगी पडली, तर त्याची जबाबदारी इटलीली पत्करावी लागेल. आम्हीही आमच्या सहा लष्करी तुकड्या आमच्या सरहद्दीवर आणून ठेवलेल्या आहेत. ट्रीस्टचे आंतरराष्ट्रीयकरण करून उरलेला “ब’ वर्गीय भाग युगोस्लाव्हियाला जोडवा.”
इटलीत गरमागरम!
रोम – ट्रीस्ट प्रकरणी इटली-युगोस्लाव्हिया हितसंबंध अत्यंत विकोपाला गेले असून इटलीतील सारे वातावरण गरमागरम होऊन गेलेले आहें. आज झालेले मा. टिटोचें भाषण ऐकण्यासाठीं इटालियन नागरिक जीवाचे कान करून बसले होतें. मार्शल टिटो यांनी सामोपचारानें घेतलें तर आपणही सामोपचारानें घेऊ, असें एकंदर लोकमत दिसतें.