मुली व महिलांच्या शिक्षणार्थ राष्ट्रीय कौन्सिलची जरूरी
नवी दिल्ली, ता. 8 – “मुली आणि महिला यांच्या शिक्षणासाठी शक्य तितक्या लवकर राष्ट्रीय परिषद (कौन्सिल) स्थापन करण्यात यावी’ अशी शिफारस महिला शिक्षण मंडळाने केली आहे. ही समिती 1958च्या मे महिन्यात दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती. या मंडळाच्या अहवालात म्हटले आहे की, महिलांचे शिक्षण हा विषय महत्त्वाचा मानून त्यासाठी निर्धारपूर्वक धाडसी प्रयत्न केले पाहिजेत तरच स्त्री-पुरूष यांच्या शिक्षणातील अंतर कमी होईल.
स्त्रीशिक्षणाच्या विकासाची जबाबदारी केंद्र सरकारने आपल्याकडे घ्यावी इतका महत्त्वाचा हा विषय आहे. शिफारशीत असेही म्हटले आहे की, महिला आणि मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न हाताळण्यासाठी खास यंत्रणा उभारावी. शिक्षण खात्यात खास स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात यावा. राज्य सरकारांनीही राज्य परिषदा स्थापावीत. एक महिला संयुक्त संचालिकाही नेमण्यात यावी.
सव्वाकोटी वर्षांपूर्वी मानवाचा पूर्वज
न्यूयॉर्क – सुमारे 1 कोटी 20 लाख वर्षांपूर्वी मानव प्राणी पृथ्वीवर होता असे अमेरिकेतील मानववंश शास्त्रज्ञ डॉ. विल्यम ई. स्ट्रॉस (जॉन हॉपकिन्स विद्यापीठ) यांनी मानववंश विषयक संस्थेला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. ते म्हणतात, की सध्याच्या प्रचलित कल्पनेपेक्षा एक कोटी वर्षापूर्वीही मानव वस्ती असावी. इटलीत सॉफ्ट कोल विभागात मोठ्या माकडांची हाडे पुष्कळ प्रमाणात सापडली आहे. त्यावेळचा तो मानवाचा पूर्वज दोन पायावर चालत होता की नाही हे नक्की नाही. मात्र तसा तो चालत असेल तर 15 सेकंदाला 100 वार अंतर तो जात असावा.
ब्राझीलमध्ये उपाशी लोकांचे शहराच्या रोखाने प्रचंड मोर्चा
रिओ दी जॅनेरो – आवर्षणाने पीडित भागातील हजारो उपाशी पोटी माणसे आणि कृश मुले अन्न आणि काम मिळवण्यासाठी शहराकडे धाव घेऊ लागले आहे. सीअेरा राज्यातील क्विक्साडा आणि इतर शहरांवर दोन हजार लोकांचा मोर्चा चालून निघाला आहे. आपणाला भूकमोर्चापासून वाचवण्यासाठी मध्य सरकारने मदत द्यावी अशी राज्य सरकारने विनंती केली आहे.