तेजाणूंमुळे जीवशास्त्रात त्वरित क्रांती – डॉ. भाभा
मुंबई, ता. 5 – जीवशास्त्रातील जी रहस्य उलगडण्यास शतके लागली असती अशी रहस्य तेजाणूंच्या साहाय्याने दहा-वीस वर्षांत शोधून काढता येतील असे उद्गार अणुशक्ती कमिशनचे अध्यक्ष डॉ. भाभा यांनी आज सकाळी किरणोत्सर्गाच्या वैद्यकशास्त्रातील उपयोगातील धोक्यापासून संरक्षण कसे करावे यासंबंधीच्या शिक्षणवर्गाचे उद्घाटन करताना काढले.
भाभा म्हणाले, “जीवधारी परमाणूंच्या रचनेतील गुंतागुंत व त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया जर तेजाणूंच्या साह्याने कळू शकली तर जीवपेशीतील विकृत वाढीमुळे निर्माण होणाऱ्या कॅन्सरसारख्या अनेक रोगांवर परिणामकारक नियंत्रण घालणे शक्य होईल. जूनमध्ये सुरू होणाऱ्या कॅनडा-भारत सहकार्याने तयार करण्यात येणारी अणुभट्टी ही सर्व जगात तेजाणू निर्माण करणारी सर्वात मोठी अणुभट्टी ठरेल. भारतातील शांततामय अणुशक्तीच्या उपयोगाबाबत एक विद्युत उत्पादन व दुसरे शेतकी, जीवशास्त्र, उद्योगधंदे व वैदक यामधील संशोधनाचे लक्ष्य आहे.
कैलास मानसरोवर अशी नवी सरहद्द ठरावी
वाराणशी – पंतप्रधान पं. नेहरू व चौ एन लाय यांच्या आगामी भेटीतून काहीही निष्पन्न होणार नाही असे वाटत असल्याचे डॉ. राम मनोहर लोहिया यांनी काल येथे जाहीर सभेत भाषण करताना सांगितले. ते म्हणाले की, भारत व चीन यांची सीमा मॅकमोहन रेषेनुसार ठरवू नये असे आमच्या पक्षाचे मत आहे. कैलास, मानसरोवर आणि त्सॅंगपो अशी ही सीमारेषा हवी असे आम्हाला वाटते.
कै. डॉ. जयकर यांच्या तैलचित्राचे अनावरण
पुणे – पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कै. डॉ. बाबासाहेब जयकर यांच्या तैलचित्राचा अनावरण समारंभ आज सकाळी विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात मुंबईचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती श्रीप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. डॉ. जयकर यांच्या कुटुंबियांनी दिलेले हे तैलचित्र विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात प्रमुख ठिकाणी लावण्यात यावयाचे आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा