द्रमुक पक्षांचे एकीकरण होणार का? करुणानिधींनी उत्तर टाळले
मद्रास – अण्णा द्रमुक व द्रमुक पक्ष यांचे एकीकरण पुन्हा होणे शक्य आहे काय, असा प्रश्न तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांना विचारता त्यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. करुणानिधी म्हणाले, अनपेक्षित गोष्टी घडल्या म्हणजे आपण दैवयोगाने घडल्या असे म्हणतो. पण आज आपण त्यास “राजकारण’ असे म्हणतो. द्रमुक पक्षातील काही “तरुण तुर्क’ तुम्हाकडे एकीकरणाचा प्रस्ताव घेऊन आले होते काय? असे विचारता करुणानिधी म्हणाले, “नाही बुवा’. कॉंग्रेस पक्षाच्या एकीकरणावर ते म्हणाले, जुने मित्र भेटले म्हणजे शब्दांचा फुलोरा फुलविण्याची जरूरी नसते.
पश्चिम पंजाबात महापुराचा कहर
नवी दिल्ली- पश्चिम पंजाबमधील पुराचा बंदोबस्त करण्यात लष्करी व मुलकी अधिकारी जोराचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सिंधू नदीचा पूर वाढतच आहे.
विश्वचषक हॉकी संघ ः भारताचा जपानवर विजय
आम्स्टट डाम – दुसऱ्या विश्वचषक हॉकी सामन्यात भारताने जपानवर 5 वि. शून्य अशा डावांनी नेत्रदीपक विजय मिळविला. हा सामना गट अ विभागात झाला. सुरजित सिंग, हरचरण सिंग, चांदसिंग व गोविंदा यांनी विजय मिळविला.
शिवसागर तलाव यंदा पूर्ण भरणार
पुणे- कोयनानगर येथील शिवसागर तलावात प्रथमच या वर्षी तेथील क्षमते इतके म्हणजे 98 हजार दशलक्ष घन फूट पाणी साठविण्यात येणार आहे. खबरदारीसाठी पाटण, कराड, सांगली या भागांतील लोकांना पुराची पूर्वसूचना देण्यासाठी ठिकठिकाणी बिनतारी संदेश केंद्रे उघडण्यात आली आहेत.
मंत्री नसल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेत आज एकही कॅबिनेट मंत्री हजर नसल्याने सभागृहाचे कामकाज 5 मिनिटे तहकूब करावे लागले.