सुवेझ कालव्याच्या भागातली युद्ध आघाडी आज त्यामानाने शांत होती. या ठिकाणी इस्रायल आणि इजिप्तचे लष्करी दल संघटित होत आहे. जॉर्डियाने असे जाहीर केले आहे की, “नागरी संरक्षक दल, होम फ्रंट आदी निमलष्करी दले सुसज्ज करण्यात येत आहेत? जॉर्डियाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी अमान विमानतळ बंद केला.
बुधवारपासून हा विमानतळ चालू होता. अरब जगतात सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या राजे हुसेन यांच्या पाऊण लाख सैन्यांपैकी किती तुकड्या या युद्धात सहभागी झाल्या आहेत, याचा अजून पत्ता लागला नाही.
अल् नहार या पत्रानुसार, 1 हजार सौदी अरेबियन दले 70 सालापासून जॉर्डनमध्ये असून युद्धात सहभागी होण्यासाठी त्यांनी सीरियात प्रवेश केला आहे. तेलाची निर्यात करणाऱ्या अरब देशांच्या संघटनेची बैठक कुवैत येथे होणार आहे. अरब देशांनी तेलाचा वापर “हत्यार’ म्हणून करावा, असा प्रयत्न बैठकीत केला जाईल.
बाजरी कमी दराने विकण्यास मनाई?
पुणे, 13 – पुण्यातील एका व्यापाऱ्याने 1 रु. 10 पैसे दराने विक्री करण्यासाठी 2 हजार पोती बाजरी आणली. या बाजरीची इतक्या कमी दरात विक्री होऊ नये म्हणून काही व्यापारी व अधिकारी आडवे आले, असे कळते.
मटण; भाव परत 8 रु. किलो केला!
पुणे – पुणे शहरातील मेंढ्या व बकऱ्या यांची आवक घटल्याने भाव वाढ (माफ करा! निर्धारण!) समितीने मटणाचा दर रविवारपासून साडेसात रु. किलो ऐवजी 8 रु. किलो करण्यास मान्यता दिली आहे. चांगले, स्वच्छ, ताजे मटण 8 रु. नी विकू असे आश्वासन यावेळी मटण विक्रेत्यांच्या प्रतिनिधींनी दिले. मटण विक्रेत्यांनी दर बुधवारी, शनिवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.