इजिप्तचे अध्यक्ष सादत यांची घोषणा
बेरुट – अमेरिकेने आक्रमण केल्यास अरब देश आपली तेलक्षेत्रे शत्रूच्या हाती देण्यापेक्षा उद्ध्वस्त करतील अशी सडेतोड घोषणा इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील विख्यात स्तंभलेखक जॅक अँडरसन यांनी अरब राष्ट्राच्या तेलक्षेत्रे काबीज करण्याची योजना अमेरिकन लष्करी तज्ज्ञ आखीत असल्याच्या बातमीचा गौप्यस्फोट केला होता. अल अन्वर पत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या धोरणाची घोषणा करताना सादत असे म्हणतात की, अमेरिकेच्या हाती तेलक्षेत्रे पडण्यापूर्वीच ती उद्ध्वत करणे आम्ही जास्त पसंत करू या अल्जेरियाचे अध्यक्ष बौमेदिन यांच्या धोरणाशी सर्व अरब राष्ट्रे सहमत आहेत.
गरजेपेक्षा जास्त पैसा असणारेच भ्रष्टाचारास जबाबदार
कोल्हापूर – आज भ्रष्टाचाराबद्दल सर्वत्र बोलले जाते परंतु ज्यांच्याजवळ गरजेपेक्षा अधिक पैसा आहे तीच माणसे याला जबाबदार आहेत, असे विचार महाराष्ट्राचे नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री उदयसिंग गायकवाड यांनी व्यक्त केले.
दलितांना न्याय देण्यास तरुणांनी पुढे यावे
श्रीरामपूर – थोर नेत्यांचे पुतळे उभारून किंवा त्यांचे गुणगान गाऊन सामाजिक विषमता नष्ट होणार नसून मागासलेल्या समाजास दिल्या जाणाऱ्या विषमतेच्या वागणुकीचा बीमोड करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे विचार शिक्षणमंत्री शरद पवार यांनी बोलताना व्यक्त केले. बेकार व पदवीधर याबद्दल बोलताना ते म्हणाले, नोकरी लागेपर्यंत घरी बसण्यापेक्षा पदवीधरांनी तो वेळ समाजाला द्यावा. सरकार त्यांना काही विकासाचे कामावर नेमण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.