अश्रूधुराची निर्मिती आता देशातच होणार
ग्वाल्हेर, दि. 23 – अश्रूधुराचे गोळे तयार करणारा देशातील पहिला कारखाना येथून सुमारे 20 किमी अंतरावर टेकेनपूर येथील सीमा सुरक्षा दल अकादमीत उभारला जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस तेथे उत्पादनास सुरुवात होईल. 8 लाख रुपयांचे परकीय चलन त्यामुळे वाचेल, अशी अपेक्षा आहे.
थायलंडच्या पंतप्रधानांचा राजीनामा
बॅंकॉक – थायलंडचे पंतप्रधान सेनी प्रमोज यांनी आज केवळ 5 महिन्यांच्या कारकिर्दीनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रमोज 71 वर्षांचे आहेत. पत्रकारांशी बोलताना ते थकलेले, परंतु हसतमुख दिसत होते. त्यांनी अधिक भाष्य केले नाही. गेल्या 19 महिन्यांत थायलंडमध्ये तीन पंतप्रधान सत्तेवर आले.
माओंचे शव जतन करून ठेवले जाण्याचा दाट संभव
पेकिंग – चीनचे दिवंगत राष्ट्रपिता माओ त्से-तुंग यांचे शव जतन करून ठेवले जाण्याचाच अधिक संभव आहे, असा अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे. माओंच्या शवाचे काय केले जाणार याबाबत अधिकृतपणे अजून काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि प्रांतिक नेत्यांनी शव जतन करून ठेवण्याचाच आग्रह धरला आहे, असे समजते. शव टिकवून ठेवले जाईल याबद्दल एका ज्येष्ठ परदेशी मुत्सदीचेही म्हणणे आहे.
सोयुझ अंतराळवीर आठ दिवसांनी पृथ्वीवर परतले
मॉस्को – सोयुझ 22 या अंतराळ यानाची “छायाचित्र’ मोहीम संपवून दोन अंतराळ यात्रिक आठ दिवसांनी आज पृथ्वीवर परत आले. दोघाही यात्रिकांची प्रकृती उत्तम आहे.