टॉम क्रूस हे हॉलीवूडमधील अत्यंत मोठे नाव आहे. टॉप गन या चित्रपटापासून त्याला मिळालेले स्टारडम आजही कायम आहे. पण हल्ली त्याचे नाव आले की मिशन इम्पॉसिबलचे नावही लगेच समोर येते.
या चित्रपटाच्या मालिकेने टॉमला जगभरात असंख्य चाहते मिळवून दिले आहे. जेम्स बॉंडच्या चित्रपटांना जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मजल मिशनच्या सिरीजने मारली आहे.
तर आताचा विषय असा की टॉम सोबत मिशनच्या पुढच्या भागात बाहुबली प्रभासही दिसणार असल्याचा दावा एका ठिकाणी करण्यात आला आहे.
प्रभास खरेतर तेलगु चित्रपटांत काम करत होता. मात्र, त्याच्या बाहुबलीने प्रांताच्या नव्हे, तर देशाच्याही सीमा ओलांडल्या अन् त्याला घरोघर पोहोचवले. त्यामुळे हिंदी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही त्याची खडान्खडा माहिती असते.
त्यामुळे आगामी चित्रपटात तो टॉमसोबत झळकणार असल्याची बातमी आल्याने ती चांगलीच व्हायरल झाली. स्वत: प्रभासने याबाबत अद्याप कोणता खुलासा केलेला नाही. त्याने होकार अथवा नकारही दिलेला नाही. मात्र, हे वृत्त शंभर टक्के सत्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी प्रभास इटलीत त्याच्या राधेशाम या चित्रपटाचे शूटींग करण्यासाठी गेला होता, त्यावेळी मिशनच्या टीमने त्याची भेट घेतल्याचे सांगण्यात येते.
तेव्हाच त्याला मिशनच्या सातव्या भागाची कथा ऐकवण्यात आली व या प्रोजेक्टवर काम करण्यास तो तयार झाल्याचे सांगितले जाते आहे. इतकेच काय, मिशनचा दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकरी यानेही या बातमीला दुजोरा दिला असल्याचाही दावा केला गेला आहे.