तरुणाई तासन्तास मोबाइलमध्ये मग्न
समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – इंटरनेट व सोशल मीडियाच्या जमान्यात श्रीगोंद्यात तरुणाईला पब्जी गेम आणि टिकटॉकचे अक्षरशः व्यसन लागल्याची परिस्थिती पहायला मिळत आहे. आयुष्याला योग्य दिशा देण्याच्या टप्प्यात तरुणाई मोबाइलमध्ये तासन्तास मग्न होऊ लागली आहे. मुलांच्या मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक पालक अक्षरशः वैतागल्याचे चित्र आहे. दरम्यान, या मनोरंजन करणाऱ्या साधनांची काही मोठ्यांना देखील मोहिनी पडलेली बघायला मिळते.
अँड्रॉइड मोबाइलच्या जमान्यात ऑनलाइन गेमिंगने तरुणाईला प्रेमात पाडले आहे. गेल्या काही महिन्यांत ‘लुडो किंग’ या मोबाइलवरील गेमने तरुणाईवर अधिराज्य गाजवले होते. चौकाचौकांत तरुण समूहाने मोबाइलमध्ये ‘डोके’ घालून बसल्याचे चित्र बघायला मिळायचे. लुडो किंग ही पैशांवर खेळण्याचे ‘फॅड’ देखील चांगलेच पसरले होते. आता तरुणांना पब्जी गेम आणि टिकटॉक या दोन्ही ऑनलाइन प्रकारांचे अक्षरशः व्यसन लागल्यासारखी स्थिती बघायला मिळत आहे. काही तरुण तर दिवस-रात्रभर हा खेळ खेळताना दिसत आहेत. सध्या पब्जी गेमचे फॅड इतके पसरले आहे की तो कसा खेळावा, शेवटपर्यंत जिवंत कसे राहावे, खेळातले वेगवेगळे मिशन्स कसे पार करावेत, अशा गोष्टींची माहिती ऑनलाइन मिळवून तरुण गेम खेळण्यात तासन्तास घालवत आहेत. पब्जी गेम खेळण्यात तरुण मुलांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर काही मोठी माणसे देखील या गेमच्या प्रेमात पडल्याचे बघायला मिळते.
पब्जी गेम खेळणाऱ्यांची वाढती संख्या बघता हा गेम कदाचित पुढचा ब्लू व्हेल’ तर ठरणार नाही ना, अशी भीती पालकांकडून व्यक्त होत आहे. पब्जी गेम हिंसकतेकडे झुकत असल्याने त्याचा विपरित परिणाम मुलांवर होत आहे. एकीकडे गेम खेळून मुलांचा स्वभाव आक्रमक होत आहे, तर दुसरीकडे गेम खेळू न दिल्यास पालक आणि मुलांमधील नात्याला ठेचही पोचत आहे. तसेच या गेममुळे अभ्यास व मैदानी खेळांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.
त्याचबरोबर 30 सेकंदाच्या मनोरंजक व्हिडिओसाठी सर्वाधिक प्रसिद्ध झालेल्या ‘टिकटॉक’ या ऍपचा तरुण मुलांएवढाच मुलींवर देखील प्रभाव बघायला मिळत आहे. कित्येक तरुण-तरुणी तासन्तास टिकटॉक बघण्यात आणि तसे स्वतःचे व्हिडिओ बनवून स्वतः प्रसिद्ध होण्यासाठी खटाटोप करताना पहायला मिळतात. टिकटॉक ऍपने मनोरंजन होत असल्याने ज्यांना अँड्रॉइड मोबाइल वापरता येतो आणि ज्यांना फावला वेळ आहे, त्या अनेक मोठ्यांना देखील टिकटॉक ऍपने मोहिनी घातली आहे. पब्जी आणि टिकटॉक सारख्या ऍप्समुळे तरुण आणि प्रौढ देखील चौकाचौकांत एकत्र बसलेले असले तरी जो-तो स्वतःच्या मोबाइलमध्येच मग्न असल्याचे बघायला मिळते. यामुळे संवाद कमी होत चालला आहे.एकूणच, श्रीगोंद्यात लुडो किंग या गेमनंतर आता पब्जी आणि टिकटॉक या दोन ऍप्सच्या ‘फॅड’ने तरुणाई अक्षरशः ‘मॅड’ झाल्याचे बघायला मिळत आहे. या गेम्समुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बाबींवर गंभीर आणि दुरोगामी परिणाम होणार असल्याचे दिसते. या गेम्सपासून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी याबाबत शाळा आणि महाविद्यालयात प्रबोधन होणे काळाची गरज बनली आहे.