विनोद मोहिते
इस्लामपूर – महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या रिक्त होणाऱ्या अध्यक्षपदावर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी.आर.पाटील यांची नियुक्ती करणार असल्याची घोषणा देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी आज कुरळप( जिल्हा सांगली ) येथे सायंकाळी व्यक्त केली.
कुरळप येथे पी आर पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात शरद पवार बोलत होते. गेली ५१ वर्षे पी आर पाटील हे सहकार क्षेत्रात आहेत. साखराळे (जिल्हा सांगली) येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते ५१ वर्षे संचालक तर यातील २५ वर्षे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री जयंत पाटील यांची कारकीर्द घडली आहे.
सहकार क्षेत्रात ५२ वर्षे राहणं अवघड आहे. मी देशाच्या लोकसभेत व राज्यात विधानसभेत ५२ वर्षे आहे. सहकार क्षेत्रातील योगदान पाहून पी आर पाटील यांना संधी देत असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मंत्री जयंत पाटील, विश्वजीत कदम,बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, धैर्यशील माने उपस्थित होते.
मार्च महिन्यात विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांची मुदत संपत आहे.