पुणे – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वतीने (डीआरडीओ) करोनाच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट आणि इतर साहित्य निर्जंतुकीकरणासाठी “अल्ट्रा स्वच्छ’ हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे पीपीई किट, इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्जंतुकीकरण करणे सोपे होणार आहे. त्यामुळे पीपीई कीटची कमतरता असल्याने आठ तास एकच कीट घालून काम करण्यापासून मुक्तता मिळणार आहे. तसेच, ती कीट पुन्हा वापरता येईल, अशी अपेक्षा डीआरडीओने व्यक्त केली आहे.
डीआरडीओच्या दिल्ली येथील न्युक्लियर मेडिसिन ऍन्ड अलाइड सायन्स (एनएमएएस) या प्रयोग शाळेत मेयर्स जेल क्राफ्ट हेल्थकेअर या कंपनीच्या सहकार्याने हे उपकरण विकसीत केले आहे. कपाटाप्रमाणे असलेल्या या उपकरणात विविध प्रकारचे कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तसेच पीपीई किट निर्जंतुकीकरण करता येते.
अतिशय कमी प्रमणात वीजेचा वापर करून हे उपकरण कार्यान्वित करता येते. तसेच आपत्कालीन यंत्रणा बंद, दरवाजामधील इंटरलॉक यासारख्या विविध सुरक्षा यंत्रणाही या उपकरणात देण्यात आला आहेत. निर्जंतुकीकरणासाठी ओझोनेटेड या अवकाश तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. हे यंत्र विकसित करण्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करून तयार केले आहे.