पुणे – भोसरीमधील इंद्रायणीनगर येथे एकाच परिसरात तब्बल 47 पत्र्यांच्या शेडमध्ये सुरू असलेली वीजचोरी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने बुधवारी (दि. 25) धडक कारवाई करून उघडकीस आणली. याप्रकरणी भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले.
भोसरीमध्ये इंद्रायणी परिसरात सुमारे 80 पत्र्यांचे शेड उभारलेले आहेत. यामध्ये औद्योगिक कारणांसाठी वीजवापर केला जात आहे. मात्र, काही शेडमध्ये अनधिकृत वीजवापर सुरू असल्याची माहिती महावितरणला मिळाली होती. त्यानुसार महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने धडक कारवाईची योजना आखली.
यासाठी एकूण 19 पथके तयार केली. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एकूण 75 अभियंते व कर्मचाऱ्यांचा या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.
पोलीस बंदोबस्तात बुधवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता इंद्रायणीनगरमधील पत्र्यांच्या शेडमधील वीजजोडण्यांची या पथकांद्वारे तपासणी सुरू केली. यात एकूण 47 पत्र्यांच्या शेडमध्ये थेट वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. दुपारी 3 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.