महावितरणचा थकबाकीदारांना “शॉक’

वीजपुरवठा खंडित करण्याच्या तयारीत : 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांकडे थकबाकी

 

पुणे – गेल्या 1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिले. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून थकबाकीवरून सुरू असलेला वाद चांगलाच चिघळण्याची शक्‍यता आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये वीजबिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या व्हीडीओ कॉन्फरंन्सिग बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नाळे म्हणाले की, सद्य:स्थितीत पुणे (1032.80 कोटी), सातारा (140.36 कोटी), सोलापूर (259.12 कोटी), सांगली (192.54 कोटी) व कोल्हापूर (337.43 कोटी) जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण 1962 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी 1247 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या 14 लाख 29 हजार 811 वीजग्राहकांनी गेल्या 1 एप्रिल 2020 पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. महावितरणकडून वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधूनदेखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने पुढील तीन आठवड्यांत या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल.

पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक थकबाकीदार

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या 10 महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक 12 लाख 68 हजार 487 असून त्यांच्याकडे 856 कोटी 81 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर, 1 लाख 38 हजार 870 वाणिज्यिक ग्राहकांकडे 264 कोटी 32 लाख आणि 22 हजार 454 औद्योगिक ग्राहकांकडे 126 कोटी 35 लाखांची थकबाकी आहे. वीजबिलांबाबत शंका, तक्रारींचे निरसन तसेच विनंती करूनदेखील प्रतिसाद नसल्याने या वीजग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यातच खंडित करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.