पिंपरी, दि. 22 – वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून आता कडक पाऊले उलचण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील 7 हजार 44 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तसेच शहरातील 1 लाख 28 हजार 5 ग्राहकांकडे 33 कोटी 8 लाख रूपयांची बाकी आहे. त्यामुळे ग्राहकांनी चालू बील आणि थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. थकबाकी न भरल्यास नाईलाजाने वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराही महावितरणच्या वतीने देण्यात आला आहे.
महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. वीज खरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापना आदींचा सर्व खर्च वीजबिल वसूलीवरच अवलंबून आहे. मात्र वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाई करण्यात येणार आहेत. गेल्या दीड महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातील 7 हजार 44 थकबादारांची वीज जोडणी खंडित करण्यात आली आहे.
थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीज जोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ऑन फिल्ड आहेत. एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यासोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची विभाग, मंडल व परिमंडल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. थकबाकीदार हा शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास दोघांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी या महिन्यात शनिवारी व रविवारी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहे. यासह घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन सोय उपलब्ध आहे.