पुणे – पुणे व पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यात सुमारे 310 रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला होता. तर काहींचा वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला होता. यातील सुमारे 95 टक्के रोहित्रांवरील वीजपुरवठा महावितरणकडून गुरुवारी सकाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.
दरम्यान, काही भागात व सोसायट्यांमध्ये अद्यापही पावसाचे पाणी साचलेले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधीत रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. बुधवारी पावसाचा जोर ओसरल्यानंतर लगेचच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कामे सुरु झाले.
मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे पुणे शहरात बुधवारी धानोरी, नगररोड, लोहगाव, वडगाव शेरी, विमाननगर, कोंढवा, रास्तापेठ, वानवडी, फातिमानगर, मंगळवार पेठ, एनआयबीएम रोड, वारजेचा काही भाग, सिंहगड रोड, धायरी, शिवणे, धायरी, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, आंबेगाव, कात्रज, सहकारनगर, पर्वती, पेशवेप्लॅट, स्वारगेट, हडपसर, हांडेवाडी, पिसोळी, पंचवटी, पाषाण, खराळवाडी, पिंपळे सौदागर, जुनी सांगवी, ताथवडे, पिंपळे सौदागर, देहू रोड, चऱ्होली, रावेत, चिखली, थेरगाव, दापोडी, हिंजवडी आदी परिसरात झाडे व मोठ्या फांद्या वीजयंत्रणेवर पडल्याने तसेच पावसाचे पाणी साचल्याने वीजयंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता.
तर काही भागात खबरदारीचा उपाय म्हणून अनेक सोसायट्यांमध्ये तसेच फिडर पिलरमध्ये पाणी साचल्याने रोहित्रांवरून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. या सर्व भागातील बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तर वीजपुरवठ्यासंबंधी ग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे कामे सुरु असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.