सोलर पॅनेलद्वारे पुणे-मुंबई महामार्गावर ऊर्जानिर्मिती

राज्यात ई-मोबिलिटीवर भर दिला जाणार : आदित्य ठाकरे

पुणे – “पर्यावरण रक्षणासाठी नूतनीक्षम ऊर्जेच्या वापरावर भर देणे काळाची गरज आहे. हीच बाब लक्षात घेत, पर्यावरण मंत्रालयातर्फे राज्यात ई-मोबिलिटी म्हणजेच इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वापरावर अधिक भर दिला जाणार आहे. तसेच, ऊर्जानिर्मितीसाठी मुंबई-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रिकाम्या जागांवर सोलर पॅनेल उभारून त्याद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या वापराबाबत अभ्यास सुरू आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) “कार्बन न्युट्रल पुणे मेट्रोपॉलिटन रिजन बाय 2030′ विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यासाठी “पीआयसी’चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने, कार्यक्रम समिती अध्यक्ष व पीआयसीचे विश्‍वस्त प्रा. अमिताव मलिक, पीएमआरडीए आयुक्‍त विक्रम कुमार, क्‍लायमेट कलेक्‍टिव्हचे डॉ. नितांत माटे, पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रियदर्शनी कर्वे, डॉ. गुरुदास नूलकर, अनिता गोखले बेनिंगर, सारंग यादवाडकर, अनुपम सराफ हे उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, “आधीच्या सरकारांनी विकासप्रकल्पांचा पर्यावरण विश्‍लेषण अहवाल गांभीर्याने घेतला नाही, मात्र आमचे सरकार हे पर्यावरणाच्या बाबतीत अधिक जागरूक आहे. प्रत्येक प्रकल्पाचा पर्यावरण विश्‍लेषण अहवालांचा गांभीर्याने विचार केला जाईल. राज्याच्या पर्यावरणीय समस्यांना गांभीर्याने घेत, त्या सोडविण्यासाठी प्रभावी उपायांचा अवलंब करणार असून, यामध्ये जनतेचाही सहभाग महत्त्वपूर्ण असणार आहे.’ तसेच, रहिवासी आणि व्यावसारिक इमारतींमध्ये सौरऊर्जा उपकरणे बसविणाऱ्यांना सवलती देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.