ओगलेवाडीत उद्योजकांचा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा

कराड -ओगलेवाडी, ता. कराड परीसरात गेली महिनाभरापासून तासन्‌तास विज पुरवठा बंद रहात असल्याने ओगलेवाडी औद्योगिक वसाहतीसह परीसरातील उद्योजकांचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे विज वितरणने आमच्या उद्योगांना टाळे लावावेत अन्यथा आम्ही विज वितरणला टाळे ठोकणार असल्याचा इशारा संतप्त उद्योजकांनी दिला आहे. वारंवार विज गायब होत असल्याने सदाशिवगड विभागातील शेतकऱ्यांसह नागरिकही वैतागले आहेत. याचा सर्वाधिक फटका ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनांना बसत आहे.

ओगलेवाडी व हजारमाचीतील उद्योजकांनी विज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी रामचंद्र वंजारी, अधिक पाटील, संदिप कोटणीस, जयंत पाटील, प्रदिप माने, वसंतराव खाडे, संदिप राऊत, जितेंद्र पोतदार, मन्सूर इनामदार, कृष्णत फुलवाले व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी विज वितरण कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडवण्यात आले. जोपर्यंत विज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत विज वितरणचे कार्यालय उघडू देणार नाही. असा पवित्रा संतप्त उद्योजकांनी घेतला.

दरम्यान, कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांच्याशी उद्योजकांनी चर्चा केली. येत्या आठ दिवसांत आवश्‍यक ती उपाययोजना करून विज पुरवठा सुरळीत करण्याचे अश्‍वासन कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांनी दिले.
एक महिन्याचे बिल माफ करा
ओगलेवाडी परीसरातील उद्योजक विज बिलापोटी दर महिन्याला लाखो रूपये विज वितरणला देतात. मात्र विज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत. त्यामुळे विज वितरणने एक महिन्याचे विज बिल माफ करावे, अशी मागणी युवा उद्योजक अधिक पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.