कोल्हापूर /प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील 1 एप्रिल 2020 पासून एकही बिल न भरलेल्या 3 लक्ष 31 हजार 951 ग्राहकांपैकी 23 हजार 158 ग्राहकांनी मागील 13 दिवसात 34 कोटींच्या थकबाकीचा भरणा करीत महावितरणच्या आवाहानास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर 831 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे.
त्यात घरगुती 3 लक्ष 3 हजार 38 ग्राहक 172 कोटी थकबाकी पैकी 15 हजार 844 ग्राहकांनी 13 कोटी रुपये भरले आहेत. वाणिज्य वर्गवारीत 22 हजार 195 ग्राहक 34 कोटी थकबाकी पैकी 5 हजार 665 ग्राहकांनी 9 कोटी रुपये भरणा केला आहे. तर औद्योगिक 6 हजार 718 ग्राहक 39 कोटी थकबाकीपैकी 1699 ग्राहकांनी 12 कोटी रुपये वीज बिल भरणा केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी मार्च 2020 रोजी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोनाचा प्रार्दुर्भाव असतांना देखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुवठा करून ग्राहकांना घरात राहणे सुसह्य केले. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही.
महावितरणला प्रचंड मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना 24X7 वीजपुरवठा करण्यासाठी दरमहिन्याला वीज खरेदी करावी लागत असून विजेच्या पारेषणवरही मोठा खर्च करावा लागत आहे.
महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्राहकांसाठी सुलभ हप्त्यात वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून दिलेली आहे. तेंव्हा महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून ग्राहकांनी चालू बिलासह थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन आहे.