चांगला दर मिळत असल्याने बटाटा उत्पादक खुशीत

दहा किलोस 310 ते 325 रुपये दर ः सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांची विक्रीसाठी लगबग

पेठ-सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी भर पावसात आपल्या बटाटा अरणी जपून ठेवल्या. दिवाळीत कितीही आर्थिक चणचण झाली तरी बटाटा अरणीपर्यंत पावसामुळे व झालेल्या चिखलामुळे कोणतेही खटारगाडी, ट्रॅकर, ट्रक आदी वाहन जात नव्हते. याच संधीचा फायदा शेकडो शेतकऱ्यांना झाला. गेल्या 10 ते 12 वर्षांत कधी नव्हे एवढा विक्रमी बाजारभाव बटाट्याला वाढला आहे. प्रति 10 किलोस 310ते 325 रुपये इतका बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्याची चांदी झाली आहे.

ज्या शेतकऱ्याचे रस्त्याच्या नजीक बटाटा अरणी होत्या त्यांनी 190 ते 210 रुपये प्रति 10 किलो भावाने आपले बटाटे विकले. मात्र रस्त्यापासून दूर अंतरावर ठेवलेल्या बटाटा अरणीपर्यंत जायला रस्ता नव्हता. शेतात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे कितीही इच्छा शेतकऱ्याची झाली की बटाटा विकावा, पण इलाज नव्हता. दलदल, गाळ, चिखल असल्याने कोणतेही वाहन बटाटा अरणीपर्यंत जाऊ शकत नव्हते. गेले तीन-चार दिवस पाऊस पूर्ण उघडून कडक ऊन दिवसभर पडत होते. त्यामुळे बटाटा अरणीपर्यंत जाण्यास अनुकूल रस्ता झाला. वाहने जाऊ शकली. त्यादरम्यान बटाट्याचे बाजारभाव वाढले. 310 रुपये इतका विक्रमी बाजारभाव 10 किलोस झाल्याने शेतकरी आपले बटाटे निवडून पिशव्यांमध्ये भरायला लगबग करू लागला. इतर वेळी गाव सकाळ व सायंकाळी गजबजलेले असायचे. पण आता गावात गर्दी कमी, शेतात जास्त असे चित्र आहे. बटाटा विक्रमी बाजाभावाने विकला जाऊ लागला. 40 टक्के शेतकऱ्यांनी बटाटे पूर्वीच विकले. मात्र 60 टक्के शेतकरी खुशीत आहेत. त्यांना शिळी दिवाळी चांगली जाणार.

शेतकऱ्यांमध्ये जसे आनंदाचे वातावरण आहे. तसेच येथील बटाटा वितरक हुंडेकरी यांच्या हुंडेकरी पुढे ट्रॅक्‍टर, ट्रक यांच्या रांगा लागल्या आहेत. 310 ते 325 रुपये प्रति 10 किलो दराने बटाटा खरेदी करण्यासाठी हुंडेकरी व्यावसायिक यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे.

  • आर्थिक गणित जमले…
    अनेक मोठ्या शेतकऱ्यांकडे हजार ते दीड हजार बटाटा पिशव्या भरतील, तर मध्यम शेतकऱ्यांकडे 500 ते एक हजार पिशव्या बटाटा अरणीत आहेत. सामान्य शेतकरी 50 ते 200 पिशव्या भरतील इतके बटाटे अरणीत ठेवतो. पाऊस थांबला, ऊन पडले, जमीन कोरडी झाली. त्यामुळे शेकडो शेतकरी आपले राखून व सुरक्षित ठेवलेले बटाटा विक्रीस काढत आहे. येत्या दोन-तीन दिवस शाळा, महाविद्यालयात येथील मुले न जाता घरी बटाटे निवडणे, पिशवीत भरणे आदी कामात घराच्या लोकांना मदत करत आहेत. गेल्या 10 ते 12 वर्षांत सातगाव पठार भागात बटाटा पिकाला इतका बाजारभाव मिळाला नव्हता. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी पावसाने शेतीचे नुकसान झाले असले तरी गेली महिना ते दीड महिना राखून व सुरक्षित ठिकाणी ठेवलेला बटाटा आता त्यांचे आर्थिक गणित चांगले करणार आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)