बटाटा पीक फुलोऱ्यात

आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील स्थिती

लाखणगाव- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात सध्या बटाट्याचे पीक फुलोऱ्यात आले असून थंडीमुळे बटाटा पिकास फायदा होणार आहे. बटाट्याला बाजारभाव चांगला असल्याने शेतकरी बटाटा पिकाची काळजी घेत आहे. पावसाने उघडीप दिल्याने पावसामुळे खराब झालेले बटाट्याचे पीक पुन्हा सावरू लागले आहे.

नागापूर, रांजणी, वळती, पारगाव, भराडी, थोरांदळे या गावांमध्ये बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी परतीचा मान्सूनचा पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने बटाट्याचे पीक सडले होते. खोलगट भागातील शेतीमधील बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणावर खराब झाले. उंचवट्यावर असलेले बटाट्‌याचे पीक या पावसातून काही प्रमाणात वाचले आहे. सध्या पडू लागलेल्या थंडीमुळे बटाट्याचे पीक तरारले आहे. पुढील 25 दिवसांत बटाट्याची काढणी सुरू होणार आहे. दरम्यान, बटाट्याला चांगला बाजारभाव असल्याने आगामी काळात तो कायम राहिल अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. सध्यस्थितीत बटाट्याला प्रतवारीनुसार दहा किलोसाठी 150 ते 200 रुपये बाजारभाव आहे. त्यामुळे काढणी केल्यानंतर किमान भांडवल वसूल व्हावे आणि चांगला नफा मिळावा, यासाठी शेतकरी बटाटा पिकाला जपत आहे. त्यामुळे शेतकरी औषध फवारणीवर जोर देत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here