शिक्षक भरती प्रक्रिया लांबणीवर

पिंपरी – अचारसंहितापुर्वी शासनाने शिक्षक भरतीची तयारी जोरदार चालविली होती. मात्र अचानकपणे आचासंहिता जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया आता थंडावली आहे.

मागील काही दिवसांपासून शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे, भरती प्रक्रियेवर परिणाम झाला असून शिक्षक भरती प्रक्रिया लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे.

राज्य शासनाने मागील काही वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द केल्यानंतर राज्यातील बेरोजगार डीएड, बीएड धारक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली व शिक्षक भरती प्रक्रियेला ब्रेक लागला. शासनाने इच्छुक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर अर्ज भरण्याचे आवाहन केल्यानंतर हजारो इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. जे उमेदवार पात्र आहेत, अशा उमेदवारांची नोंदणीही या पोर्टलवर झाली आहे. त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. सध्या, शिक्षक भरती प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत असले तरी ही प्रक्रिया पूर्णपणे थंडावली आहे.

उमेदवार पात्र ठरल्यानंतर त्याला पसंती क्रमांक देण्यात येणार होता. मात्र, पात्र उमेदवारला अद्याप पसंती क्रमांक देण्यात आलेला नाही. ही प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी असलेला शिक्षण विभागही आता निवडणुकीच्या कामात गुंतला आहे. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीच्या कामात जुंपण्यात आल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेसाठी कर्मचारीच नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे, शिक्षण भरती प्रक्रियेची तयारी करण्यात आलेली असली तरी सध्या मनुष्यबळ पुरेस नसल्याने तसेच आचारसंहितेमुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडली आहे.

संस्थाचालकांना दिलेली मुदत संपली
संस्थाचालकांनी आपल्या संस्थेतील रिक्तपदाची जाहीरात प्रसिध्द केली होती. संस्थाचालकांना ते घेणार असलेल्या उमेदवाराची मुलाखत हवी की नको हा पर्याय स्वीकारण्यासाठी मार्च अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आज संपली आहे. मात्र, उमेदवाराला पसंती क्रमांक देण्याची तारीख अद्याप निश्‍चीत झालेली नसल्याने पसंती क्रमांक देण्यास सुरवात कधी होणार असा प्रश्‍न अर्ज भरलेल्या उमेदवाराकडून उपस्थित केला जात आहे. उमेदवारांना योग्य उत्तरे शिक्षण विभागाकडून मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.