पुणे, दि. 16 (सुनील राऊत) – ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता खाकी कपडे आणि सायकलची घंटी वाजवत. सुख:दुखाची खबरबात न चुकता पोहचविणारे पोस्टमन आता लवकरच “ई-बाइक’वरून टपाल वाटप करताना दिसणार आहेत, पोस्टाच्या पुणे विभागाकडून राज्यात पहिल्यांदाच “ई-बाइक’च्या वापराचा प्रयोग सुरू केला गेला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. देशात बंगळुरू शहरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे विभागाकडून या उपक्रमासाठी प्रायोगिक तत्वावर सहा ‘ई-बाइक’ वापरण्यात येत आहेत. पोस्टाच्या पिंपरी-चिंचवड (पूर्व) पार्सल सेवेसाठी या दुचाकी वापरण्यात येत असल्याची माहिती पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली.
पुणे विभागात सुमारे 400 ते 500 पोस्टमन आहेत. शहरात येणारी पत्रे, पोस्टाच्या माध्यमातून आलेल्या शासकीय नोटीस तसेच नागरिकांच्या पसंतीस उतरलेल्या पार्सल सेवेच्या माध्यमातून नागरिकांना घरापर्यंत पोस्टाकडून सेवा दिली जाते. ही सेवा देणारे पोस्टमन शहरात फिरण्यासाठी सायकल वापरतात तर काही पोस्टमन आजही आसपासच्या भागात चालत पत्र पोहचवितात. ठराविक अंतरावर थांबावे लागत असल्याने त्यांच्याकडून सायकलला प्राधान्य दिले जाते. मात्र, आता केंद्र शासनाकडून “ई-वाहनांना’ प्रोत्साहन दिले जात आहे. मोहिमेला हातभार लावण्यासह वेगवेगळ्या सुविधा देत कात टाकणाऱ्या पोस्ट खात्यात आता लक्षणीय बदल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोस्टमनसाठी “ई-बाइक’ वापरण्यात येणार आहेत, त्याचा वापर राज्यात पुणे विभागातून सुरू करण्यात आला आहे.
पार्सल सेवेपासून सुरुवात…
“ई-बाईक’वरून सेवेची सुरूवात पोस्टाच्या पिंपरी-चिंचवड (पूर्व) विभागासाठी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सहा
“ई-बाइक’ पोस्टमनला देण्यात आल्या असून त्या माध्यमातून पार्सल घरोघरी दिली जात आहेत. एप्रिल महिन्यापासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून महिन्याला सरासरी आठ हजार पार्सल या वाहनांच्या माध्यमातून पोहचविली जात आहेत. तर, लवकरच इतर पार्सल विभागांसाठी आणि त्यानंतर पोस्टमनसाठीही “ई-बाइक’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
देशामध्ये बेंगलोर शहरात पोस्टमनसाठी “ई-बाइक’ वापरण्यात येत आहेत. राज्यात पुण्यात पहिल्यांदा या सेवेचा वापर सुरू करण्यात आला असून या पार्सल सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनुभव चांगले आहेत. त्यामुळे, लवकरच “ई-बाइक’ वापराची व्याप्ती वाढविण्यात येणार असून पुण्यातही पोस्टमन ‘ई-बाइक’ घेऊन वाटप करू शकतील.
– रामचंद्र जायभाये, पोस्ट मास्तर जनरल, पुणे विभाग