पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील पदव्युत्तर आणि एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा येत्या 28 ते 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्यांना ही परीक्षा सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत कधीही देता येणार आहे. तर, निकाल 3 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.
सध्या करोनाचा प्रादुर्भाव असूनही साधारण 3200 जागांसाठी देशभरातील सुमारे 28 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिले जातात.
या प्रवेश प्रक्रियेत पदवी अभ्यासक्रमांसाठीची ऑनलाइन प्रवेश परीक्षा प्रॉक्टर्ड मेथडने पार पडली. आता या मेथडने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मोबाइल, टॅब, लॅपटॉप, कम्प्युटर अशा साधनांचा वापर करुन घरबसल्या परीक्षा देता येणार आहे.
ही परीक्षा देताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे अडचण येऊ नये; तसेच विद्यार्थ्यांना प्रॉक्टर्ड मेथडची संपूर्ण माहिती व्हावी, यासाठी विद्यापीठाकडून 21 ते 26 सप्टेंबरदरम्यान मॉक टेस्ट आयोजन करण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षेबाबत सविस्तर सूचना आणि संपूर्ण माहिती येत्या 16 सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल, अशी माहिती पदव्युत्तर प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली.