पुणे – राज्यातील कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले. विद्यार्थ्यांना येत्या 21 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे देण्यात आली.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत 10 विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची 38 महाविद्यालये कार्यरत आहेत.
यामधील प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता 1 हजार 335 एवढी आहे. या महाविद्यालयांमध्ये कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, मत्स्यविज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, काढणी पश्चात व्यवस्थापन हे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेली सामायिक प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. प्रत्येकी विद्याशाखेची स्वतंत्र सामायिक परीक्षा घेण्यात आली. सामायिक प्रवेश परीक्षेचे 70 टक्के गुण आणि पदवीचे 30 टक्के गुण विचारात घेऊन प्रवेश दिले जाणार आहेत.
- ऑनलाइन अर्ज व माहितीसाठी संकेतस्थळ : www.maha-agriadmission.in
कृषी पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक
- प्रवेश प्रक्रिया सुरुवात : 10 सप्टेंबर
- अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर
- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : 30 सप्टेंबर