पोस्टरवर केवळ बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचाच उल्लेख
मुंबई: “गोर गरीब शेतकऱ्यांना पीक कर्जावर रुपये दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमुक्ती, करुन दाखवलं “असा मजकूर असणारे पोस्टर्स शिवसेनेने राज्यातील अनेक शहरांमध्ये झळकवली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. 24 डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथिगृहावर पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मान्यता देण्यात आल्यानंतर हे पोस्टर्स लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला उल्लेख टाळण्यात आला आहे.
शिवसेनेने शेतकरी माय बापचे सरसकट कर्जमुक्ती करून दाखवलं….!!!!! pic.twitter.com/pz4u5wNfn1
— aniketdeshmukh (@aniketd25969687) December 26, 2019
औरंगाबाद, पिंपरी-चिंचवडसहीत इतर काही शहरांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो असणारे कर्जमुक्तीसंदर्भातील मोठे बॅनर्स झळकवले आहेत. उद्धव यांच्याबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो या बॅनर्सवर आहे. मात्र या बॅनर्सवर सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या नव्या मित्रपक्षांचा सधा उल्लेखही नसल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या हाती मदत मिळण्याआधीच शिवसेनेकडून पोस्टरबाजी करुन कर्जमाफीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पोस्टर्सबरोबर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनाही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही पोस्टर्स शेअर केले आहेत.