बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटेने होळीनिमित्त आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. राधिका ही “मिसेज अंडरकवर’ या चित्रपटात एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून अबीर सेनगुप्ता हे निर्माता म्हणून आपली कारकीर्द सुरू करत आहे.
विशेष म्हणजे, लेखक-निर्माता अनुश्री मेहता यादेखील दिग्दर्शन म्हणून नवीन क्षेत्रात पाउल ठेवत आहे. या चित्रपटात राधिका आपटेसह अभिनेता सुमीत व्यास मुख्य भूमिका साकारत आहे. राधिका आपटे म्हणाली, मेहता यांनी या चित्रपटाची पटकथा सांगितल्यानंतर ती तातडीने त्यांना होकार दिला. या पटकथेत नावीन्य असल्याने मी खूपच प्रभावित झाल्याचे तिने सांगितले.
रिलीज करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये एका सर्वसामान्य महिलाच्या भूमिकेत ती बंदूक घेवून दिसत आहे. एका निवेदनात राधिका म्हणाली, या चित्रपटातील सर्व भाव एकत्रितपणे पोस्टरमधून दाखविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि यात आम्हाला यश आल्याचे प्रतित होते. आता आम्हाला चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास राधिका नुकतीच “ए कॉल टू स्पाई’मध्ये झळकली होती. या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूपच आवडली होती. तसेच आयुष्मान खुरानासह “अंधाधुन’मध्येही तिने निर्णायक भूमिका साकारली होती.